जबरी लुट करणारा कुख्यात गुन्हेगारांना धुळ्यातून अटक ; १७ लाखांची रोख रक्कम हस्तगत!
यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोठ्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार साहिल शहा सत्तार शहा आणि त्याचा साथीदार अनस शहा अबुबकर शहा या दोन फरार आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता धुळे व जळगाव परिसरातून शिताफीने अटक केली आहे.
या कारवाईमुळे आतापर्यंत या गुन्ह्यात एकूण १७ लाख ३६ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.यावल येथील या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी याआधीच तीन आरोपींना अटक केली होती. मात्र, मुख्य सूत्रधार साहिल शहा फरार होता. तो धुळे-चोपडा रोडवर आल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले, तर दुसरा आरोपी अनस शहा यालाही अटक करण्यात आली.अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी साहिल शहा हा धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत आणि अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी घरफोडी, वाहन चोरी, मंदिर चोरी आणि अंमली पदार्थ कायद्यान्वये सहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. नुकत्याच अटक केलेल्या या दोन आरोपींकडून ३ लाख ४२ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. यासह या गुन्ह्यातील जप्त केलेली एकूण रक्कम आता १७ लाख ३६ हजार रुपयांवर पोहोचली आहे.

