धनाजी नाना महाविद्यालयाच्या एनएसएस सातदिवसीय श्रमदान शिबिराचा तिसरा दिवस उत्साहात संपन्न
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी — येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने आयोजित सातदिवसीय विशेष श्रमदान शिबिराचा तिनही दिवस मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी संपन्न झाले.

तिसऱ्या दिवसाच्या शिबिराच्या दुपारच्या प्रथम सत्रात प्रा. कल्पना पाटील यांनी “व्यसनाधीनता व युवक/युवती” या विषयावर स्वयंसेवकांना सखोल मार्गदर्शन केले. व्यसनांचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे उपाय तसेच युवकांनी सामाजिक जबाबदारी जपण्याचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
द्वितीय सत्रात एनएसएस विभागीय समन्वयक प्रा. डॉ. संदीप धापसे यांनी “वनसंवर्धन ही काळाची गरज” या विषयावर मार्गदर्शन केले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्वयंसेवकांना पटवून दिले.

तसेच या शिबिराला धनाजी नाना महाविद्यालयातील महिला प्राध्यापक डॉ. सरला तडवी, प्रा. उन्नती चौधरी, प्रा. सीमा बारी, प्रा. नयना पाटील, प्रा. रमेश वाघ, प्रा. नरेंद्र वाघोदे, प्रा. आरती भिडे, प्रा. किरण शहा व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदिच्छा भेट देऊन स्वयंसेवकांचे मनोबल वाढविले.
शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये सामाजिक भान, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि व्यसनमुक्त जीवनशैलीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले.

