राजकीय हालचालींना वेग; सत्ताधारी-विरोधकांकडून मोर्चेबांधणी गतीने
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया २१ डिसेंबर रोजी पूर्ण झाल्यानंतर आता उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. प्रशासकीय नियमांनुसार उपनगराध्यक्ष निवडीसाठी मंगळवार, १५ जानेवारी रोजी पहिली विशेष सभा बोलावण्यात आली असून, याबाबतची लेखी सूचना सर्व नगरसेवकांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
ही विशेष सभा भुसावळ येथील प्रांत कार्यालयातील ताप्ती सभागृहात आयोजित करण्यात आली असून, लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडणार आहे. या सभेत उपनगराध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया रीतसर पार पडणार असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आणि हालचाल निर्माण झाली आहे.भुसावळ नगरपरिषदेत एकूण ५० नगरसेवक असून, सध्याचे राजकीय बलाबल लक्षवेधी आहे.भाजपचे २७ नगरसेवक असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १२, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २, शिंदे गटाची शिवसेना २, काँग्रेस ३ तर अपक्ष ४ नगरसेवक आहेत. अपक्षांपैकी एक नगरसेवक सुजित भोळे हे भाजप विचारांचे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे संख्याबळाच्या गणितात हे मत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगराध्यक्ष पदाची निवड यापूर्वी अत्यंत अटीतटीच्या लढतीत पार पडली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता उपनगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडीत प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नगराध्यक्षांना मिळणारे एक निर्णायक मतही या निवडीत निर्णायक ठरू शकते. यामुळे सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांकडून नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी, आपले संख्याबळ अबाधित राखण्यासाठी आणि संभाव्य डावपेच आखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी गतीने सुरू आहे.उपनगराध्यक्ष पदासाठी कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडला जाणार, सत्ताधारी भाजपकडून कोणाला संधी मिळणार, की विरोधकांकडून एखादा अनपेक्षित राजकीय धक्का दिला जाणार, याबाबत सध्या तरी चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र, सभा जवळ येत असताना राजकीय भेटीगाठी, चर्चासत्रे आणि हालचालींना वेग येत असल्याचे दिसून येत आहे.१५ जानेवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेकडे भुसावळकरांसह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून,ही निवड शहराच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.