Thursday, January 29, 2026
Homeगुन्हामध्य रेल्वे दक्षता पथकाची धडक कारवाई; तोतया रेल्वे बोर्ड निरीक्षक रंगेहाथ अटकेत

मध्य रेल्वे दक्षता पथकाची धडक कारवाई; तोतया रेल्वे बोर्ड निरीक्षक रंगेहाथ अटकेत

मध्य रेल्वे दक्षता पथकाची धडक कारवाई; तोतया रेल्वे बोर्ड निरीक्षक रंगेहाथ अटकेत
भुसावळ | खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क
मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने मोठी कारवाई करत रेल्वे बोर्डाचा दक्षता निरीक्षक असल्याची बनावट ओळख करून रेल्वे कर्मचाऱ्याकडून पैसे उकळणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याला अटक केली आहे.
रेल्वे कर्मचाऱ्याकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे दक्षता विभागाने सखोल नियोजन करून दि. २२ रोजी कल्याण रेल्वे स्थानकावर सापळा रचला. या कारवाईत तक्रारदाराकडून २०,००० रुपये स्वीकारताना हरीश कांबळे याला दक्षता पथकाने रंगेहाथ पकडले.
आरोपी हरीश कांबळे याने स्वतःला रेल्वे बोर्डाचा दक्षता निरीक्षक असल्याचे भासवून डीआरएम कार्यालय, मुंबई येथील थकीत वेतन मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराकडून २०,००० रुपयांची मागणी केली होती. याआधीही बदली करून देण्याच्या नावाखाली आरोपीने तक्रारदाराकडून ६०,००० रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतल्याचा आरोप आहे. मात्र, बदली न झाल्याने तक्रारदाराचा संशय बळावला.
यानंतर आरोपीने थकीत रक्कम लवकर परत मिळवून देतो, असे सांगत पुन्हा संपर्क साधल्याने तक्रारदाराने दक्षता विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार आखलेल्या सापळ्यात आरोपीला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. पुढील तपासासाठी त्याला शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी), कल्याण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम, २०२३ मधील कलम ३१८ (२) व ३१९ (२) अंतर्गत फसवणूक व तोतयागिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३१८(२) अंतर्गत दंडासह कमाल ३ वर्षांचा कारावास, तर कलम ३१९(२) अंतर्गत दंड किंवा कमाल ५ वर्षांचा कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
मध्य रेल्वेने भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका पुन्हा स्पष्ट करत रेल्वे कर्मचारी व नागरिकांनी अशा कोणत्याही फसवणूक अथवा बनावट प्रकारांना बळी न पडता तात्काळ संबंधित प्राधिकरणांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या