भुसावळ-मिरज , अमरावती-पनवेल दरम्यान दोन विशेष रेल्वे धावणार
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेने विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला असून दोन मार्गावर अनारक्षित विशेष रेल्वे धावणार आहेत.
विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी लक्षात घेता., भुसावळ ते मिरज आणि अमरावती ते पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळामध्ये ही रेल्वे सेवा अमरावती, अकोला, जळगाव, नाशिक, पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना उपयुक्त ठरणार आहे.भुसावळ-मिरज (०१२०९) क्रमांकाची विशेष गाडी २३ जानेवारीला सायंकाळी ४.५० वाजता भुसावळ येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५० वाजता मिरज येथे पोहोचेल. परतीची ०१२१० क्रमांकाची गाडी २६ जानेवारी रोजी मिरज येथून सायंकाळी ७ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता भुसावळ येथे पोहोचेल. भुसावळ-मिरज आणि मिरज-भुसावळ या गाडीला अप आणि डाऊन मार्गावर जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी आणि सांगली येथे थांबे असतील.
अमरावती-पनवेल (०१४१६) हि विशेष गाडी २२ जानेवारीला अमरावती येथून दुपारी १२ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पनवेल येथे पोहोचेल. तर पनवेल-अमरावती (०१४१५) क्रमांकाची परतीची गाडी २६ जानेवारीला पनवेल येथून रात्री ७.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता अमरावती येथे पोहोचेल. अमरावती-पनवेल आणि पनवेल-अमरावती या गाडीला अप व डाऊन मार्गावर बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा आणि कर्जत येथे थांबे देण्यात आले आहेत.