ग्रामीण रुग्णालय, यावल जिल्हा जळगाव येथे ५ बेडचे ‘NRC’ केंद्र कार्यान्वित.
जळगाव. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कुपोषण निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यावल मोहाडी व चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दि. २१ जानेवारी २०२६ पासून ५ खाटांचे (Beds) सुसज्ज पोषण पुनर्वसन केंद्र (Nutrition Rehabilitation Centre – NRC) अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे.
या केंद्राचे नियोजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.स्वप्नील सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, यामुळे यावल तालुक्यातील तीव्र कुपोषित (SAM) बालकांना आता स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाचे उपचार आणि आहार मिळणार आहे.
NRC केंद्राची प्रमुख वैशिष्ट्येः
तज्ज्ञ सेवाः बालरोगतज्ज्ञ आणि प्रशिक्षित परिचारिकांमार्फत २४ तास देखरेख.
पोषण आहारः कुपोषित बालकांसाठी तज्ज्ञांनी सुचवलेला विशेष आहार (F-75, F-100) मोफत उपलब्ध.
मातांचे समुपदेशन बालकांसोबत राहणाऱ्या मातांना आहार आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले जाणार.
भत्ता सुविधाः केंद्रात भरती असलेल्या बालकांच्या पालकांना मजुरीच्या नुकसानीपोटी शासनाच्या नियमानुसार ठराविक भत्ताही दिला जाणार आहे.
………..
“कुपोषणमुक्त जळगाव मोहिमेअंतर्गत यावल , चाळीसगाव व मोहाडी महिला रुग्णालय येथे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या कमी वजनाच्या किंवा कुपोषित बालकांना उपचारासाठी या केंद्रात दाखल करावे, जेणेकरून बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.”
-मिनल करनवाल ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव
या सुविधेमुळे आता यावल आणि परिसरातील दुर्गम भागातील नागरिकांना कुपोषणाच्या उपचारासाठी जिल्हा मुख्यालयात जाण्याची गरज उरणार नाही. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी केले.

