एरंडोल तालुक्यात दोन तलाठ्यांना ३० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
एसीबीच्या सापळा कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ
एरंडोल | प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यात महसूल विभागातील दोन तलाठ्यांनी ३० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा कारवाईत दोघांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर संदेश दिला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्रांतर्गत जळगाव घटकाने ही कारवाई केली. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८/२०२६ दाखल करण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत नरेश भास्कर शिरूड (वय ४१), तलाठी सजा उत्राण अहिर हद्द, ता. एरंडोल व शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६), तलाठी सजा उत्राण गुजर हद्द, ता. एरंडोल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदाराचा ट्रॅक्टर २७ जानेवारी २०२६ रोजी गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतूक करताना पकडण्यात आला होता. यानंतर पुढील कारवाई टाळण्यासाठी व ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी आरोपी तलाठ्यांनी सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी केली होती. पडताळणीदरम्यान ही मागणी ३० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली.
“इतरांकडून जास्त घेतो, तू गरीब आहेस म्हणून तुझ्याकडून ३० हजार घेतो,” असे सांगत आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पंचासमक्ष मागणी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा कारवाई राबविण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत आरोपी शिवाजी घोलप यांनी नरेश शिरूड यांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने दोघांना रंगेहात पकडले.
सापळा कारवाईदरम्यान आरोपी नरेश शिरूड यांच्या ताब्यातून १ लाख ७३ हजार ३०० रुपये रोख, सुमारे २,९५० रुपये किमतीची Paul John कंपनीची ७५० मि.ली. व्हिस्कीची बाटली (गिफ्ट पॅक) तसेच ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी काम पाहिले. पथकात पो.नि. हेमंत नागरे, पो.अं. प्रदीप पोळ, पो.अं. अमोल सूर्यवंशी व पो.अं. सचिन चाटे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले.

