१२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करत विनयभंग ; नराधमाला ठोकल्या बेड्या!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करत विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिसांनी संशयित आरोपी सुरेश जयराम मोरे याला अटक केली असून पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे एका भागात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत.२६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी आणि तिची ९ वर्षांची लहान बहीण घरी एकट्याच होत्या. यावेळी संशयित आरोपी सुरेश मोरे याने घरात शिरून पीडित मुलीशी अश्लील कृत्य केले आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कोणाला सांगितल्यास ‘जीवे ठार मारून टाकेल’ अशी धमकीही त्याने पीडितेच्या बहिणीला दिली.संशयित आरोपी हा इतक्यावरच न थांबता, २८ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपीने सम्राट नगर परिसरात तिचा रस्ता अडविला. त्याने तिचा हात धरून तिला बळजबरीने आपल्या घरात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. या भीषण प्रसंगानंतर पीडित मुलीने तिच्या पालकांना सर्व हकीकत सांगितली. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

