बारावी परीक्षा केंद्रावर तोडफोड; अफसर खानसह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल !
मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूलमध्ये सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश करून तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिंदे शिवसेना पक्षाचा राज्यस्तरीय प्रदेश अध्यक्ष पद भूषवणारा अफसर खान याच्यासह दहा ते पंधरा जणांवर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परीक्षा केंद्राचे संचालक तथा अंतुर्ली येथील तराळ विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रामकृष्ण बाऊस्कर (वय ५८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपर सुरू असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने मुख्य प्रवेशद्वारातून परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश केला. संबंधित व्यक्ती सुमारे एक ते दीड तास मोबाईलवर संभाषण करत होती. त्यानंतर तो केंद्राबाहेर निघून गेला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


