जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून जिल्ह्यात २७ ठिकाणी खोडा शेडचे बांधकाम सुरू
जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि. २३ मार्च २०२६):
जिल्ह्यातील पशुधनावर उपचार करताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सोयीचे जावे तसेच पशुधनाचे ऊन, वारा व पावसापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने जिल्हा परिषद जळगाव तर्फे महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून जिल्ह्यात २६ ठिकाणी खोडा शेड उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
या कामासाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून ४९ लाख ५० हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या पशुधनाला उन्हापासून, वाऱ्यापासून तसेच पावसापासून संरक्षण मिळावे तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार प्रक्रिया अधिक सोयीस्कर व्हावी या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात एकूण २६ खोडा शेड उभारण्यात येत असून त्यापैकी काही शेडचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. या सुविधेमुळे पशुधनाच्या उपचारांसाठी अधिक चांगले व सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार असून पशुपालकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्हा परिषद जळगावच्या माध्यमातून पशुसंवर्धन क्षेत्रात विविध सुविधा निर्माण करून पशुपालकांना मदत करण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले

