पिंपळगाव : ट्रान्सफॉर्मर चोरी प्रकरण उघड; ७ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ :
पिंपळगाव खुर्द शिवारात विद्युत वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी सात आरोपींना रंगेहात अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव उपविभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या सोनल आपसिंग पावरा (वय ३०) यांनी भुसावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक १९ मार्च २०२६ रोजी पहाटे सिनीयर टेक्निशियन विनोद प्रभाकर तायडे यांनी त्यांना फोनद्वारे पिंपळगाव खुर्द येथील शेतातील विद्युत डीपी (ट्रान्सफॉर्मर) चोरीस गेल्याची माहिती दिली.
त्यानंतर सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, संबंधित ठिकाणी महावितरण कंपनीचा ६३ केव्हीए क्षमतेचा ग्रे रंगाचा ट्रान्सफॉर्मर आढळून आला नाही. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत पिकअप वाहन (क्रमांक MH-19 CY 1971) मधून चोरी केलेला ट्रान्सफॉर्मर जप्त केला.

या प्रकरणात अर्जुन आत्माराम सोनवणे, रविंद्र अशोक भिल, धिरज रामदास जोहरे, आरबाजशहा अनवरशहा फकीर, गौरव कैलास इंगळे, शुभम सुनिल सोनवणे (सर्व रा. पिंपळगाव खुर्द, ता. भुसावळ) तसेच कामरानशहा महेमुदशहा फकीर (रा. आर्यन कॉलनी, भुसावळ) या सात जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी रात्रीच्या सुमारास ट्रान्सफॉर्मर खाली पाडून तो पिकअप वाहनात टाकून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहाटे साडेएक वाजता पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान ही घटना उघडकीस आली आणि आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
चोरीस गेलेल्या ट्रान्सफॉर्मरची किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील तपास भुसावळ पोलीस करत आहेत.

