Monday, March 23, 2026
Homeजळगावसुनील दैवे मृत्यू प्रकरण : संताप उसळला; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

सुनील दैवे मृत्यू प्रकरण : संताप उसळला; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

सुनील दैवे मृत्यू प्रकरण : संताप उसळला; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
बोदवड – खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – शहरात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून उफाळलेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुनील शामराव दैवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिक, नातेवाईक आणि विविध सामाजिक घटकांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साध्या वादातून सुरू झालेल्या या घटनेने अचानक हिंसक वळण घेतले. आरोपींकडून झालेल्या बेदम मारहाणीत सुनील दैवे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने उपचार सुरू असतानाच काल रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या

 

निधनाची वार्ता समजताच शहरभर शोककळा पसरली.
दरम्यान, आज सकाळी संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आरोपींना त्वरित अटक व कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. काही काळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. “या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतरच कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारला.
यानंतर सुनील दैवे यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
नागरिकांचा इशारा
या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या