एनमुक्टोच्या पाठपुराव्याला यश : परीक्षा कालावधीत ८-९ दिवसांची कपात

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील परीक्षा वेळापत्रकाच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून एनमुक्टो प्राध्यापक संघटनेने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आपले प्रस्तावित आंदोलन मागे घेतले आहे.
दिनांक 29 मार्च 2026 रोजी एनमुक्टो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. कुलगुरूंना निवेदन सादर करून तब्बल दोन तास सविस्तर चर्चा केली. यावेळी कुलगुरूंनी परीक्षा 30 मे 2026 पर्यंत लांबण्यामागे परीक्षा विभागाची मोठी चूक असल्याचे मान्य केले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे तातडीने वेळापत्रकात मोठे बदल करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात, तर ऐनवेळी वेळापत्रक बदलल्यास विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता असल्याचे नमूद करून प्राध्यापकांनी परीक्षा कामासाठी सहकार्य करावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
या पार्श्वभूमीवर परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे तसेच प्राध्यापकांच्या हक्काच्या सुट्ट्यांचे नुकसान झाल्याची बाब नमूद करत, केवळ कुलगुरूंच्या भावनिक आवाहनाचा आदर राखत व विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत एनमुक्टो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रस्तावित आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी कुलगुरूंनी परीक्षा विभागाच्या चुका लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्याची जाणीव करून दिली जाईल तसेच भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटी टाळण्यासाठी ठोस नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
दीर्घ चर्चेनंतर परीक्षा वेळापत्रकात काही प्रमाणात सुधारणा करण्यास वाव असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अंतिमतः परीक्षा कालावधी कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. पूर्वी 30 मे 2026 पर्यंत लांबलेला परीक्षा कालावधी कमी करून 22 मे 2026 पर्यंत आणण्यात आला असून, एकूण 8 ते 9 दिवसांची कपात करण्यात एनमुक्टो संघटनेला यश आले आहे. नवीन वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
याच चर्चेदरम्यान शैक्षणिक नियमिकेनुसार असलेला उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी (6 मे 2026 ते 15 जून 2026) यात बदल करून 15 मे 2026 ते 23 जून 2026 असा नवीन सुट्टी कालावधी जाहीर करण्यात आला असल्याची माहितीही समोर आली.
मा. कुलगुरू प्रो. डॉ. विजय महेश्वरी, प्र-कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत एनमुक्टो चे केंद्रीय अध्यक्ष प्रा. नितीन बाविस्कर, केंद्रीय सहसचिव डॉ. विजय सोनजे, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ.शैलेश वाघ डॉ.मोहन पवारा, डॉ.महेश गांगुर्डे, सचिव डॉ.लिलाधर पाटिल, डॉ.हेमंत पाटील,डॉ. , व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.सुरेखा पालवे, एमफुक्टो चे पदाधिकारी डॉ.अविनाश निकम,सिनेट सदस्य डॉ.संदीप नेरकर, याशिवाय मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ.जयवंत मगर व सचिव डॉ.अनिल हिवाळे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. यावेळी दालनात तिन्ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयितील शाखांचे पदाधिकारी व 55 ते 60 पेक्षा अधिक सदस्य उपस्थित होते.
मा. कुलगुरूंना दिलेल्या निवेदनावर एनमुक्टो चे केंद्रीय अध्यक्ष प्रा. नितीन बाविस्कर व केंद्रीय सहसचिव डॉ. विजय सोनजे यांच्या सह 39 प्राध्यापकांच्या सह्या आहेत.
यापूर्वी एनमुक्टो संघटनेने दिलेल्या निवेदनात उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत परीक्षा घेण्याचा निर्णय हा शैक्षणिक नियमिकेचे उल्लंघन असून प्राध्यापकांच्या हक्काच्या सुट्यांवर गदा आणणारा आहे, असा ठपका ठेवत परीक्षा वेळापत्रक रद्द करून नवीन वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच परीक्षा नियोजनातील त्रुटींसाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.
या सर्व घडामोडींमुळे विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या निर्णयात सुधारणा करत परीक्षा कालावधी कमी करण्याचा मार्ग स्वीकारला असून, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाने NMUCTO ने पुन्हा एकदा प्राध्यापकांच्या हितासाठी संघर्ष देणारी जुझारू संघटना असल्याचे व विद्यार्थी हित लक्षात घेऊन आंदोलन मागे घेतल्यामुळे सामाजिक,राजकीय व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने एनमुक्टो च्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

