आमदार अमोल जावळे यांच्याकडून श्री गणेश सार्वजनिक वाचनालयास १११ स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट :: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पाऊल

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी न्हावी ता. यावल दि 2
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रोत्साहन देणारे एक स्तुत्य पाऊल उचलत रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल जावळे यांनी श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयास तब्बल १११ स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट दिली. या पुस्तकांची एकूण किंमत सुमारे ८३ हजार रुपये इतकी असून, या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास साहित्य सहज उपलब्ध होणार आहे.
यावेळी बोलताना आमदार जावळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवून आपल्या गावाचा व परिसराचा सर्वांगीण विकास साधावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही पुस्तके देण्यात आली आहेत. योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार साहित्य मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड क्षमता आहे, यावर त्यांनी विश्वास व्यक्त केला.
संस्थेचे चेअरमन अरुण गाजरे, व्हा. चेअरमन शरद चोपडे, सचिव युवराज तळेले तसेच संचालक मंडळाने या उपक्रमाचे स्वागत करत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या प्रसंगी संचालक नितीन चौधरी, ललितकुमार फिरके, मिलिंद बेंडाळे, चेतन इंगळे, प्रवीण वारके, गंगाराम वाघुळदे, प्रशांत बोरोले, तसेच ग्रंथपाल ललित इंगळे, कर्मचारी भास्कर भोगे आणि वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल ललित इंगळे यांनी केले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ग्रामीण भागात शिक्षणाची नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

