Tuesday, June 23, 2026
Homeजळगावजिल्हा परिषद शाळेची सुरक्षा धोक्यात; संरक्षक भिंत व गेटअभावी शाळा परिसरात सापांचा...

जिल्हा परिषद शाळेची सुरक्षा धोक्यात; संरक्षक भिंत व गेटअभावी शाळा परिसरात सापांचा वावर

जिल्हा परिषद शाळेची सुरक्षा धोक्यात; संरक्षक भिंत व गेटअभावी शाळा परिसरात सापांचा वावर

सावदा :    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून, सुरक्षेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितासह आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेला संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार नसल्याने शाळेच्या परिसराचा वापर सर्रास सार्वजनिक मार्गाप्रमाणे केला जात असल्याने शैक्षणिक वातावरण बाधित होत आहे.

कुंपण नसल्यामुळे ग्रामस्थ तसेच शेतकरी शाळेच्या प्रांगणातूनच वाहने आणि गुरेढोरे घेऊन जात आहेत. परिणामी, शाळा परिसरात सतत वर्दळ राहून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट जनावरे वर्गखोल्यांपर्यंत पोहोचत असल्याने शैक्षणिक साहित्याचे नुकसान होत असून, विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

शाळेच्या इमारतीची स्थितीही चिंताजनक आहे. वर्गखोल्यांच्या छताला योग्य वॉटरप्रूफिंग नसल्याने पावसाळ्यात छत गळत असून, पडलेल्या भेगांमधून पाणी थेट वर्गात झिरपत आहे. त्यामुळे संगणक व अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य खराब होण्याचा धोका निर्माण झाला असून, शॉर्टसर्किटची भीतीही वाढली आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घेणेही कठीण होत आहे.

दरम्यान, फरशांच्या खाली पोकळी निर्माण झाल्यामुळे साप आणि घुशींचा वावर वाढला आहे.

गेल्या काही दिवसांत शाळा परिसरात साप आढळल्याच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, संरक्षक भिंत नसल्यामुळे काही नागरिकांकडून शाळेतील स्वच्छतागृहांचाही वापर केला जात असल्याची तक्रार समोर आली आहे.स्थानिक नागरिक व पालकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शाळेला संरक्षक भिंत, प्रवेशद्वार तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या