वरणगावात पाईपलाईन व्हॉलचे चेंबर जमिनीवरच; लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील वार्ड क्रमांक ५ मध्ये अमृत योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या पाईपलाईनच्या व्हॉलचे चेंबर जमिनीच्या वरच उघडे असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः लहान मुलांसाठी हे चेंबर धोकादायक ठरत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील रहिवासी व लहान मुले याच भागात खेळत असतात. अशा परिस्थितीत उघडे व जमिनीच्या वर असलेले चेंबर कोणत्याही क्षणी अपघातास कारणीभूत ठरू शकते. नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.स्थानिकांच्या मते, संबंधित चेंबर योग्य प्रकारे जमिनीत बसवून त्यावर मजबूत झाकण बसविणे आवश्यक आहे. अन्यथा, एखाद्या निष्पाप बालकाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर वरणगाव नगरपरिषद, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच संबंधित सभापती यांनी तातडीने दखल घेऊन आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असताना प्रशासन याकडे किती लवकर लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.