Sunday, April 26, 2026
Homeजळगावभुसावळच्या नगराध्यक्षांचे पद धोक्यात जातीचा दाखला पडताळणी समितीने अवैध ठरवला

भुसावळच्या नगराध्यक्षांचे पद धोक्यात जातीचा दाखला पडताळणी समितीने अवैध ठरवला

भुसावळच्या नगराध्यक्षांचे पद धोक्यात
जातीचा दाखला पडताळणी समितीने अवैध ठरवला
भुसावळ,  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ नगराध्यक्षा गायत्री भंगाळे (गौर) यांचा अनुसूचित जातीचा दाखला जिल्हा जातपडताळणी समितीने अवैध ठरवला आहे. त्यामुळे त्यांचे पद धोक्यात आले असून, शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निवडणूक पार्श्वभूमी

गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये झालेल्या भुसावळ पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जाती (महिला) साठी नगराध्यक्षपद राखीव होते. एकूण आठ उमेदवार रिंगणात असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या गायत्री भंगाळे (गौर) यांनी भाजप उमेदवार व वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा १,८४७ मतांनी पराभव केला. निवडीनंतर त्यांनी पदाची सूत्रे हातात घेतली.
तक्रार आणि तपास

गायत्री भंगाळे यांनी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आणि त्याच दिवशी ते मिळाले. मात्र, रजनी सावकारे, संजय तायडे, राहुल तायडे व प्रमोद सावकारे यांनी जळगाव येथील जातपडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, भंगाळे यांचा दाखला बनावट असून, त्यांचे नातेवाईक कुर्मी व तर काही चर्मकार जातीचे असून मूळ रहिवास उत्तर प्रदेशातील महुवा जिल्हा असल्याचा आरोप होता.
समितीचा निकाल
गुरुवार (ता. २३ एप्रिल) समितीने (अध्यक्षा नयना बोदर्डे, सचिव एन. एस. रायते, सदस्य आर. आर. महाजन यांच्या समितीने दाखला अवैध ठरवला. प्रांताधिकाऱ्यांनी पुराव्यांची सखोल चौकशी न करता दाखला दिल्याचे निरीक्षण नोंदवून त्यांच्यावर कारवाईचे निर्देश दिले. तक्रारदारांतर्फे अॅड. वसंत भोलाणकर, तर गायत्री भंगाळे यांतर्फे अॅड. आनंदसिंग बयास यांनी काम पाहिले.
या निर्णयामुळे भुसावळेत राजकीय चिंतेचे वातावरण असून, आगामी काळात मोठ्या उलथापालथीची शक्यता आहे.
गायत्री भंगाळे माजी आमदार व स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत असल्याचे शहरात बोलले जात आहे .
या निकाला बाबत अनेक दिवसा पासून चर्चा होती . शहरात चर्चा होती सदरचा निकाल हा राजकीय सत्तेच्या दबावाखाली देण्यात आल्याचा आरोप आता केला जात आहे . या निकालाच्या विरोधात गायत्री भंगाळे अपिलात जाणार हे नक्की यामुळे आज तरी राजकीय तापमान वाढले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या