भुसावळच्या राजकारणाचा पंचनामा !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ मधील राजकारणाला सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. जनतेत चर्चिलेल्या जाणाऱ्या घडामोडी जाणून भुसावळच्या राजकारणाचा पंचनामा टप्याटप्याने मांडला जाणार आहे. भूतकाळातील घडामोडीही यात असणार आहेत!
आज पहिला भाग !
भुसावळ नगर परिषदेच्या कुरघोडीच्या राजकारणाने भुसावळचे नागरिक अक्षरश वैतागून गेले आहेत. राजकीय परिपक्वता कुणीही दाखवत नाही. मतदारांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपला नाकारले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला स्वीकारले परंतु बहुमत मात्र भाजपला दिले. दोघांनी या गोष्टीचे मंथन करण्यापेक्षा मात देण्याचा प्रयत्न सुरु करून राजकीय वाद ,हेवेदावे याचे प्रदर्शन मांडले आहे. कधीकाळी भुसावळ शहर हे भुसखेडे असे हिनवले जात होते. काँग्रेसचाच बालेकिल्ला भुसावळ होता. पण शिवसेनेने येथे पाय रोवले. ऍड जगदीश कापडे. स्व. राजेंद्र दायमा , संतोष चौधरी,अनिल चौधरी , नीलकंठ भारंबे , स्व. नीलकंठ फालक (पंछी ) , युवराज लोणारी आदींचा यात समावेश आहे. याच वेळी भाजपानेही आपले पाय भुसावळात भक्कम रोवले होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत शिवसैनिकांनी भुसावळ नगरपसरिषदेत शिवसेनेचा नगराध्यक्ष व तालुक्यात शिवसेना भाजप युतीचा आमदार निवडून आला.

भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी संतोष चौधरी या सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तीची वर्णी लागली. राज्यात युतीची सत्ता व नगर परिषदेत पण सत्ता याचा पुरेपूर लाभ चौधरी यांनी घेत शहरात विकास कामांचा धडाका सुरु केला. सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन तसेच हिंदुत्वाची पेरणीच त्यांनी केली होती. अनेकांना अनपेक्षित पाने पणे प्रथमच सभापती पदे लाभलीअर्थात अनेक समाजांच्या पहिल्यांदाच संधी लाभली होती . नगर परिषदेत केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी विधानसभेची उमेदवारी मागितली पण त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली त्यात त्यांचा पराभव झाला पण त्यांनी दुसरे स्थान मिळविले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस तृतीय स्थानी होती.
बंडखोरी केली म्हणून शिवसेनेतून हकालपट्टी होऊन नगराध्यक्ष पद जाण्याची शक्यता होती. त्यांनी दुसरा गट स्थापन करून नागराध्यक्ष पद आपल्याकडे ठेवले. त्यावेळी त्यांच्या सोबत युवराज लोणारी हे देखील होते. त्याच कालखंडात खा.शरद पवार हे काँग्रेस मधून बाहेर पडलेले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. राज्यात काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार सत्तेवर आले होते. चौधरी यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यावेळी राष्ट्रवादी तर्फे भुसावळ ची विधानसभा निवडणूक वासुदेव इंगळे यांनी लढवली होती. माजी आ. देविदास भोळे हे देखील एनसीपी मध्ये होते. अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असलेले आणि अनेकांचे किंगमेकर ठरलेले नगरसेवक वासुदेव इंगळे यांना पहिल्यांदाच उपनगराध्यक्षपद मिळाले. याच वेळी नगराध्यक्ष संतोष चौधरी हे जपानला अभ्यास दौऱ्यासाठी गेले आणि इंगळे यांची प्रभारी नगराध्यक्ष म्हणून वर्णी लागली.
नंतर लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा संतोष चौधरी यांनी युतीच्या कांताबाई बियाणी यांचा पराभव केला. नगर परिषदेत ४७ पैकी २४ जागा राष्ट्रवादी ने तर २३ जागा युतीने जिंकल्या होत्या.पण त्यांचे अत्यंत जवळचे वासुदेव इंगळे हे पराभूत झाले होते. राज्यात आघाडीची सत्ता होती त्यामुळे संतोष चौधरी यांनी शहरात विकास कामांचा सपाटाच लावला. व्यापारी संकुले , उद्याने , रस्ते , गटारी ,पथ दिवे , स्वच्छता, अंत संस्कारातही मोफत लाकडे आदी कामे सुरु झाली. महापुरुषांचे पुतळे उभारले गेले. विविध समाजांना सभागृह बांधण्यासाठी जागा नगर परिषदेने दिल्या.विरोधी पक्षाच्या वार्डात देखील विकास कामे झाली. त्यामुळे विरोधी पक्षातील अनेक नगरसेवक राष्ट्रवादी सोबत आले. ” सबका साथ सबका विकास ” हे तेव्हाच चौधरी यांनी करून दाखविले होते.त्यामुळे विधान सभा निवडणुकीत त्यांनी रेकॉर्ड करत मताधिक्य घेत विजय मिळविला. संतोष चौधरी हे आ.संतोष चौधरी झाले. त्यांनी भुसावळ तालुकयातील राजकारणावर पकड घट्ट केली . कोणत्याही निवणुकीत त्यांचाच वर चश्मा राहिला. आजरोजी भाजपा मध्ये निष्ठावान म्हणवून घेणारे अनेक जण तेव्हा शिवसेना , भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पदे भूषवून घेतलेले आहेत.
चौधरी यांचा दबदबा कमी करण्यासाठी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप ,शिवसेना ,काँग्रेस ने एकत्र येऊन शहर बचाव आघाडी बनवून निवडणुकीत यश मिळविले . पण अपेक्षित विकास कामे न करता आल्याने हि आघाडी फुटली व अडीच वर्षात चौधरी यांनी नगर परिषदेवर आपली सत्ता स्थापन केली. उपनगराध्यक्षपदी सौ. फालक यांचे वर्णी लागली दरम्यानच्या काळात भुसावळ विधानसभा SC राखीव झाली.त्यावेळी संजय सावकारे हे आ. संतोष चौधरी यांचे स्वीय्य सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यांचे बंधू प्रमोद सावकारे हे चौधरी परिवाराचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत युतीचे ऍड राजेश झाल्टे यांचा अल्प मतांनी पराभव झाला.चौधरी बंधूनी आपली सर्व ताकद लावून स्वीय्य सहाय्यक यांना आमदार निवडून आणले. त्यावेळी भुसावळ मध्ये माजी आ. संतोष चौधरी व आ. संजय सावकारे ” असे अनेक ठिकाणी मिश्किलीने चर्चिले जात असे.याच वेळी राज्यात पुन्हा काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार सत्तेवर आले होते. काही कारणांनी माजी आ. संतोष चौधरी यांना तुरुंगात जावे लागले होते तर त्यांचे बंधू अनिल चौधरी हे हद्दपार होते. राज्यात आघाडी सरकार आणि या सरकारमध्ये आ. सावकारे होते.