भुसावळच्या राजकारणाचा पंचनामा
भाग २
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी मधील राजकारणाला सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. जनतेत चर्चिल्या जाणाऱ्या घडामोडी जाणून भुसावळच्या राजकारणाचा पंचनामा टप्याटप्याने मांडला जाणार आहे. भूतकाळातील घडामोडीही यात असणार आहेत . आज दुसरा भाग
भुसावळ नगर परिषदेच्या कुरघोडीच्या राजकारणाने भुसावळचे नागरिक अक्षरश वैतागून गेले आहेत. मतदारांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपला नाकारले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला स्वीकारले परंतु बहुमत मात्र भाजपला दिले. दोघांनी या गोष्टीचे मंथन करण्यापेक्षा मात देण्याचा प्रयत्न सुरु करून राजकीय वाद ,हेवेदावे याचे प्रदर्शन मांडले आहे.
आज भाजपात असलेले अनेक नगरसेवक पूर्वाश्रमी माजी आ.संतोष चौधरी यांचे समर्थक राहिलेले आहेत. त्यातील अनेकांना राजकारणात आणून स्थिर करण्यात चौधरी यांचाच हात आहे. या उलट ना. संजय सावकारे यांनी भाजपात प्रवेश केल्यावर त्यांच्या सोबत राष्ट्रवादी मधून भाजपात आलेल्या त्यांच्या समर्थकांनाच स्थानिक निवडणुकीत अधिकाधिक उमेदवारी दिली. मूळ भाजपचे लोक आजही उमेदवारीच्या प्रतिक्षेतच आहेत. २०१७ च्या नगर परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा आ. संजय सावकारे समर्थकांनाच उमेदवारी चे झुकते माप राहिले. भाजपचे संघटनात्मकपदे सुद्धा ना.सावकारे समर्थकांच्याच पदरी अधिकाधिक पडले हि वस्तुस्थिती नाकारली जाऊ शकत नाही .
थोडे भूतकाळात डोकावल्यास २०१२ च्या नगर परिषदेच्या निवडणुकीत आ.संजय सावकारे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते. राष्ट्रवादी खालोखाल भाजप, खान्देश विकास आघाडी व मीना आघाडी असे सदस्य निवडून शिवाय अपक्ष देखील होते. नगराध्यक्षपदी उमेश नेमाडे यांची वर्णी लागली. योगायोगाने काही महिन्यांनी आ.संजय सावकारे यांच्या रूपात भुसावळला पहिल्यांदा राज्यमंत्रीपद व पालकमंत्री पद लाभले. नेमाडेंना नगराध्यक्ष आणि सावकारे यांना आमदार करण्यात चौधरी यांचाच हात होता. परंतु जेव्हा ना.सावकारे आणि चौधरी यांच्यात दुरावा झाला व भुसावळच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली. चौधरी समर्थक आणि ना.सावकारे समर्थक असे गट नगर परिषदेत , संघटनेत पडले. नगर परिषदेचा अडीच वर्षांचा कालखंड समाप्त झाला. राष्ट्रवादीकडून नगरसेवक अख्तर पिंजारी यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्चित झाले. पण एनसीपी चे नगरसेवक युवराज लोणारी यांनी बंड केले त्यांना नगर उदयसिंग काके , राजेंद्र आवटे व अन्य लोकांनी साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बंड केलेल्या नगरसेवकांची संख्या खाविआ च्या नगरसेवकांच्या संख्येपेक्षा कमी होती. बंड केले नगरसेवक , भाजप , खाविआ आणि अपक्ष नगरसेवक अशी मोट लोणारी यांनी बांधली अर्थातच ना. संजय सावकारे यांच्या शिवाय हे होणे शक्य नव्हते. यात ट्विस्ट असा होता कि , नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक अजय भोळे हे इच्छुक होते. ते भाजप गटनेते व विरोधी पक्षनेता देखील होते. संख्याबळ भाजपाचे सरस होते. पण मोक्याच्या क्षणी त्यांना डावलून प्रमोद नेमाडे यांना भाजपा गटनेते करण्यात आले. या निवडणुकीत पक्षाचा व्हीप प्रकरण नागरिकांच्या चर्चे चा विषय राहिला. भाजपाचा उमेदवार नाही म्हणून अजय भोळे तटस्थ राहिले तर नगरसेविका भावना अजय पाटील यांनी पिंजारी यांच्या पारड्यात मतदान केले.पिंजारी यांची नगराध्यक्ष पदी वर्णी लागली .
कारण कोणतेही असो पण निवडणूक लढण्याची भाजपची संधी राष्ट्रवादी काँग्रेस मधील ना. संजय सावकारे समर्थक लोणारी यांच्याकडे गेली. सावकारे समर्थकांना संधी देण्याची सुरुवात येथून झाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.


