बसस्थानकातून सोन्याची पोत चोरी प्रकरणी महिलेस मुद्देमालासह अटक

भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने भुसावळ बसस्थानक परिसरात घडलेल्या 3 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 22 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पोत चोरीप्रकरणी एका महिला आरोपीला ताब्यात घेऊन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आरोपीकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुसुम देविदास चौधरी वय 62, व्यवसाय , रा. शिवराय नगर, मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर) यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार, दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास फिर्यादी भुसावळ बस स्टँड येथे चोपडा बसमध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून 22 ग्रॅम वजनाची व 3,20,000 रुपये किमतीची सोन्याची पोत लबाडीने चोरून नेली होती.
या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 194/2026, बी.एन.एस. 2023 कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक जळगाव श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ विभाग केदार बारबोले तसेच पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.
तपासादरम्यान भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकातील हे .कॉ विजय नेरकर, कांतीलाल केदारे, सचिन चौधरी, पो.कॉ. महेंद्र पाटील, अक्षय कोतकर, योगेश माळी, चंद्रकांत रायपुरकर, जावेद शहा, भुषण चौधरी, अमर आढाळे, दिलीप कोळी, जिवन कापडे, हर्षल महाजन, व म .पोकॉ शिल्पा राठोड यांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू ठेवला होता.
यावेळी पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत चोरी करणाऱ्या महिला आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कुलसुमबी मुस्ताक शेख रा. यावल हिला ताब्यात घेतले आहे.
चौकशीदरम्यान संबंधित महिला आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीस गेलेली 3,20,000 रुपये किमतीची 22 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जप्त करण्यात आली. त्यामुळे हा चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणाचा पुढील तपास हेकॉ कांतीलाल रघुनाथ केदारे हे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले व पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशाने करीत आहेत.
दरम्यान, भुसावळ बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांवर चिंता व्यक्त करण्यात येत असून, याठिकाणी सकाळपासूनच पोलिस बंदोबस्ताची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

