Monday, April 27, 2026
Homeजळगावमहावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्ती कामांना वेग

महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्ती कामांना वेग

महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्ती कामांना वेग

जळगाव :  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              येत्या काही दिवसांमध्ये मान्सूनचे आगमन होत आहे. पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या जळगाव परिमंडलामधील वीज उपकेंद्रांतील व वीजवाहिन्यांवरील यंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे वेगाने सुरू आहेत.

पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे टाळण्यासाठी व विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे प्रामुख्याने दर शनिवारी करण्यात येत आहेत. गरज पडल्यास इतर दिवशीही महावितरणकडून ही कामे सुरू आहेत. महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे संबंधित वीजग्राहकांना पूर्वनियोजित वीज बंद होण्याबाबत कळवण्यात येत आहे. सोबतच बाधित होणाऱ्या क्षेत्रात पर्यायी अन्य वीजयंत्रणेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे.

पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या छोट्या फांद्या तोडणे, तुटलेले पिन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉप-अप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सुलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे यासह उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉप-अप या व इतर विविध दुरुस्ती कामांसह वीजपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे करण्यात येत आहेत.

खाजगी किंवा विविध संस्था मालकीच्या जागेतील झाडांच्या मोठ्या फांद्या वादळ व मुसळधार पावसामुळे कुंपणाबाहेरील वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. त्याचा अंदाज घेऊन वीजवाहिन्यांना संभाव्य धोका असणाऱ्या झाडांच्या मोठ्या फाद्यांची संबंधितांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची पूर्वपरवानगी घेऊन किंवा त्यांच्या साह्याने छाटणी करावी. यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे महावितरणकडून कळवण्यात आले आहे.

उन्हाळ्यात जपून वापरा वीज

उन्हाळ्यात विजेची मागणी वाढलेली असते. छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून वीजनिर्मिती करणाऱ्या ग्राहकांचीही संख्या वाढली आहे. प्रामुख्याने हे ग्राहक कमाल वीज मागणीच्या वेळेत (संध्याकाळी 6 ते 10) जास्त विजेचा वापर करतात. इतरही ग्राहक फॅन, कुलर, ए.सी.चा उन्हाळ्यात पुरेपूर वापर करत आहेत. तसेच काही ठिकाणी गॅस टंचाईमुळे इंडक्शनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्व कारणांमुळे विद्युत वाहिन्या ओव्हरलोड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ग्राहकांनी या काळात विजेचा जपून वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

प्रामुख्याने दिवसा वापरा वीज

स्मार्ट टीओडी मीटर बसवलेल्या ग्राहकांनी सकाळी 9 ते 5 या वेळेत वीज वापरल्यास महावितरणकडून प्रतियुनिट 85 पैसे सवलत दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी पाणी भरण्यासाठी व वॉशिंग मशीनसारखी इतर उपकरणे या वेळेत वापरली तर बचतही होईल आणि रात्री ओव्हरलोडचा प्रश्नही निर्माण होणार आहे.

दर्जेदार कुलर वापरा

उन्हाळ्यात कुलरचा वापरही प्रचंड वाढलेला आहे. ग्राहकांनी शक्यतोवर आयएसआय प्रमाणित कुलर खरेदी करूनच तो वापरावा, असे मत ऊर्जा क्षेत्रातील जाणकारांनी व्यकत केले आहे. आयएसआय प्रमाणित कुलर हे कमी वीज वापरतात. या कुलरच्या रचनेत विद्युत सुरक्षेचीही खबरदारी घेतलेली असते. आयएसआय प्रमाणित नसलेली उपकरणे प्रचंड वीज वापरतात आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही ती परिपूर्ण नसतात, असे तज्ञांचे मत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या