भुसावळात नोट बदलण्याच्या कारणावरून राडा : दुकानदारावर जीवघेणा हल्ला
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – शहरातील जामनेर रोड परिसरात असलेल्या ‘साक्षी ऑटो पार्ट्स’ या दुकानात नोट बदलण्याच्या कारणावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. २७) सायंकाळी सुमारे ७.३० वाजता घडली. या घटनेत दुकानदारावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून दुकानाची तोडफोडही करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दुकानात नोट बदलण्याच्या कारणावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला. मात्र, हा वाद वाढत जाऊन हाणामारीत परिवर्तित झाला. आरोपींनी हातातील लोखंडी पाईपने दुकानदारावर हल्ला केला. हल्ला चुकवण्याचा प्रयत्न करत असताना दुकानदाराच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर इतर आरोपींनी चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली.घटनेदरम्यान आरोपींनी दुकानात दगड व विटा फेकून तोडफोड केली. दुकानातील टायर व इतर साहित्याची नासधूस करण्यात आली. तसेच लोखंडी पाईप व लाकडी दांड्यांनी मारहाण करत “मारून टाकू” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी ठानसिंग मेहरे (पूर्ण नाव अज्ञात), त्यांचा मुलगा मोहीत ठानसिंग मेहरे (वय २०, रा. शिवपूर कन्हाळा) तसेच अन्य ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अजय कन्हैयालाल माखीजा यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.