मंत्री संजय सावकारेंच्या प्रयत्नाने घंटागाड्यांचा डिझेल‑प्रश्न सुटला,

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भुसावळ नगरपरिषदेतील राजकीय अस्थिरता आणि प्रशासनात दिशाभूल होऊ नये, असे मानून भारतीय जनता पक्षाने मंत्री आणि आमदार संजय सावकारे यांच्या भुसावळ येथील जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. पुढील ७२ तासांत कचरा‑संकलन पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी यावेळी नगरपरिषदेच्या वर्तमान राजकीय‑प्रशासकीय परिस्थितीवर गंभीर आरोप केले. प्रशासनात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासन पूर्णतः ठप्प झाल्याचा आरोप भाजपने केला.
नगरसेवक पिंटू कोठारी यांनी स्पष्टपणे सांगितले की, मागील आठ वर्षांत शहरात सुरळीतपणे चालणाऱ्या घंटागाडी‑व्यवस्थेला सत्ताधाऱ्यांनी मुरडले आहे. त्याआधी शहराला ‘माझी वसुंधरा’ योजनेत स्वच्छ शहराचा पुरस्कारही मिळाला असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, गायत्री भंगाळे यांच्या अध्यक्षपदी आल्यानंतर घंटागाडी व्यवस्था बंद करून पूर्णपणे नियोजन बदलले गेले, ज्याचा परिणाम शहर कचऱ्याच्या ढीगांखाली दबले जाण्यात झाला आहे.
कचऱ्याच्या प्रश्नावर थेट हस्तक्षेप करताना मंत्री संजय सावकारे यांनी संबंधित पेट्रोल पंप चालकाला समजावून सांगितले आणि घंटागाड्यांसाठी डिझेल पुरवठा पुन्हा सुरू करण्यास सांगितले. रात्रीपासून स्वच्छताकाम पुन्हा सुरू होणार असून, पुढील ७२ ता मागील ठेकेदाराला पुन्हा कामास सुरुवात करण्यास सांगण्यात आले असून, ठेकेदारानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी २०१६ साली शहरात कचऱ्याचे “साम्राज्य” असल्याचा उल्लेख करत म्हटले की, भाजपने सत्ता मिळाल्यानंतर स्वतःच्या खर्चाने घंटागाड्या राबवून शहर स्वच्छ केले. मात्र, गेल्या चार महिन्यांत सत्ताधाऱ्यांनी विकासकामे आणि स्वच्छता या दोन्ही क्षेत्रांत अक्षरशः वाट लावल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर, मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्यावेळी झालेले विकासकामे पुन्हा सुरू करण्यात येतील आणि स्वच्छतेचा प्रश्नही लवकरच मार्गी लावला जाईल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला.
ही पत्रकार परिषद उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, नगरसेवक राजेंद्र आवटे, किरण कोलते, गिरीश महाजन, प्राची उदय पाटील, महेंद्रसिंग ठाकूर, पिंटू कोठारी, प्रकाश बतरा, आशिष पटेल, तसेच माजी नगरसेवक सतीश सपकाळे, देवा वाणी, अजय नागराणी, चेतन सावकारे, उदय पाटील, रूपेश देशमुख आदींच्या उपस्थितीत झाली.
भुसावळ नगरपरिषदेत चालू असलेल्या सत्तासंघर्षामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न राजकीय‑कायदेशीर वळणावर आला आहे. नगराध्यक्षपदाचा मान्यताप्रश्न न्यायालयात चालू असताना, प्रशासनातील अस्थिरता आणि मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या एक महिन्याच्या रजेमुळे प्रशासन “सैरभैर” झाल्याचा दावा भाजपने केला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत भुसावळ नगरपरिषदेत राजकीय घडामोडींना आणखी गती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

