Thursday, May 21, 2026
Homeजळगावविधानपरिषद निवडणुकीत अनिल चौधरींची एन्ट्री; तिरंगी लढतीचे संकेत 

विधानपरिषद निवडणुकीत अनिल चौधरींची एन्ट्री; तिरंगी लढतीचे संकेत 

चौधरी परिवार पुन्हा मैदानात; नगराध्यक्ष-माजी नगराध्यक्षांच्या भेटीगाठींना वेग !

जळगावच्या राजकारणात हालचाली वाढल्या; अनिल चौधरी पुन्हा मैदानात?

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जळगाव जिल्ह्यात आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून अनिल चौधरी यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. जिल्ह्यातील नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच विविध राजकीय पदाधिकाऱ्यांशी त्यांचे संपर्क वाढले असून चौधरी परिवार निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

विधानपरिषद निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले; चौधरींच्या बैठका सुरू

मागील विधानपरिषद निवडणुकीत निखिल खडसे, मनीष जैन आणि अनिल चौधरी यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. त्या निवडणुकीत चौधरी यांनी जिल्हाभर प्रभावी प्रचार करत स्वतःची राजकीय ताकद दाखवून दिली होती. विशेषतः विधानसभा निवडणुकीदरम्यान यावल-रावेर मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यानंतर त्या परिसरात त्यांचा जनसंपर्क अधिक मजबूत झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

मागील पराभवानंतर नव्या रणनीतीसह चौधरींची एन्ट्री चर्चेत !

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, मागील निवडणुकीत अनिल चौधरी यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात प्रचार मोहीम राबवली होती. मात्र उमेदवारी जाहीर होण्यास झालेला विलंब त्यांच्यासाठी अडचणीचा ठरल्याचे बोलले जाते. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, योग्य वेळी उमेदवारी जाहीर झाली असती तर निवडणुकीचे चित्र वेगळे असू शकले असते.

भुसावळमध्ये मोठ्या बैठकीची तयारी; विधानपरिषद निवडणुकीसाठी हालचाली वेगात !

दरम्यान, चौधरी परिवाराने पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणीवर भर दिला असून जिल्ह्यातील विविध भागांत संपर्क अभियान सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांत अनिल चौधरी यांनी अनेक नगराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्षांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भुसावळ येथे लवकरच मोठी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

गोहाटीपासून जळगावपर्यंत चर्चेत राहिलेले अनिल चौधरी पुन्हा सक्रिय !

शिवसेना-भाजप सरकार स्थापनेच्या काळात गोहाटी येथे सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये अनिल चौधरी हे बच्चू कडू यांच्या सोबत असल्याची चर्चा राज्यभर रंगली होती. त्यामुळे आगामी विधानपरिषद निवडणुकीत त्यांची भूमिका काय राहणार, याकडे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या