Monday, May 25, 2026
Homeगुन्हाभुसावल रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई: केरळमधील १८ लाखांच्या मोबाईल चोरीतील ४ संशयित...

भुसावल रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई: केरळमधील १८ लाखांच्या मोबाईल चोरीतील ४ संशयित आरोपी जेरबंद!

भुसावल रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई: केरळमधील १८ लाखांच्या मोबाईल चोरीतील ४ संशयित आरोपी जेरबंद!

 

मंगला एक्स्प्रेसमधून ३७ महागडे मोबाईल आणि रोकड जप्त

 

केरळ पोलिसांच्या मदतीने भुसावल स्टेशनवर रचला सापळा

 

भुसावल:  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

केरळमधील कन्नूर येथील एका मोबाईल दुकानातून तब्बल १८ लाख रुपये किमतीचे ३७ महागडे मोबाईल चोरून पळ काढणाऱ्या ४ सराईत गुन्हेगारांना भुसावल रेल्वे सुरक्षा बलाने फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून महागड्या कंपन्यांचे नवीन मोबाईल आणि नगद रक्कम जप्त करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी आरोपींना केरळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

रेल्वे नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती टीप

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या इरिट्टी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३६०/2026, भारतीय न्याय संहिता च्या विविध कलमांन्वये हाय व्हॅल्यू थेफ्ट (मोठ्या चोरीचा) गुन्हा दाखल झाला होता. हे आरोपी ट्रेन क्रमांक १२६१७ डाऊन मंगला एक्स्प्रेसने प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती कन्नूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अनुज यांनी भुसावल रेल्वे प्रशासनाला दिली. आरोपींच्या फोटोंसह मिळालेल्या या माहितीनंतर भुसावलचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आणि सहाय्यक सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावल स्टेशनवर विशेष पथक तैनात करण्यात आले.

 

प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर थरार

Oplus_131072

 

मंगला एक्स्प्रेस भुसावल स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर रात्री २२:०२ वाजता आली. रेल्वे थांबण्यापूर्वीच आरपीएफ आणि सीआयबीच्या टीमने दोन गट तयार करून ट्रेनला दोन्ही बाजूंनी वेढा घातला. उपनिरीक्षक सुदामा यादव, उपनिरीक्षक श्याम यादव, सीपीडीएस टीमचे महेंद्र कुशवाहा, इम्रान खान, योगेंद्र वानखेडे, विनोद कुमार आणि कपिल कुमार यांच्या पथकाने प्रत्येक डब्याची कसून झडती सुरू केली. शेवटी, ट्रेनच्या मागील बाजूच्या जनरल डब्यात संशयास्पदरीत्या बसलेल्या चार प्रवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दिल्ली आणि बिहारचे कनेक्शन

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

राहुल जायसवाल (वय ३२, रा. पूर्व चंपारण, बिहार; सध्या रा. नवी दिल्ली)

मोहम्मद नसीम अंसारी (वय ३०, रा. पूर्व चंपारण, बिहार; सध्या रा. नवी दिल्ली)

रवी कुमार सहनी (वय २२, रा. समस्तीपूर, बिहार; सध्या रा. नवी दिल्ली)

राधेश्याम रामेश्वर यादव (वय ३५, रा. पूर्व चंपारण, बिहार; सध्या रा. गुरुग्राम, हरियाणा)

१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींची कसून झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीचे खालील ब्रँडेड मोबाईल आणि साहित्य आढळून आले:

Apple (आयफोन): ०७ नग

Motorola: ०७ नग

Samsung: ०६ नग

Oppo: ०६ नग

Realme: ०६ नग

Vivo: ०३ नग

Redmi: ०१ नग

Nothing: ०१ नग

एकूण जप्त माल: ३७ नवीन मोबाईल (अंदाजे किंमत १८ लाख रुपये), २५,१९० रुपये रोख, आरोपींचे ३ वैयक्तिक मोबाईल आणि दुकान फोडण्यासाठी वापरलेला एक मोठा स्क्रू ड्रायव्हर.

आरोपी केरळ पोलिसांच्या ताब्यात

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी केरळमधील मोबाईल दुकान फोडल्याची कबुली दिली. भुसावल आरपीएफने जप्त केलेल्या मुद्देमालासह चारही आरोपींना पुढील तपासासाठी केरळचे उपनिरीक्षक सरफरुद्दीन यांच्या स्वाधीन केले आहे. केरळ पोलीस ट्रान्झिट वॉरंट घेऊन आरोपींना घेऊन रवाना झाले असून, मध्य रेल्वेच्या भुसावल विभागाच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या