Monday, May 25, 2026
Homeजळगाव स्विमिंग पूलमध्ये सापडलेली ५० हजारांची सोन्याची चैन केली परत

 स्विमिंग पूलमध्ये सापडलेली ५० हजारांची सोन्याची चैन केली परत

चिमुकलीच्या प्रामाणिकपणाची ‘सुवर्ण’ भरारी!

स्विमिंग पूलमध्ये सापडलेली ५० हजारांची सोन्याची चैन केली परत

 

निसटलेली सोनसाखळी पाहूनही विचलित झाले नाही मन

 

विकास कॉलनीतील आठवीत शिकणाऱ्या रिद्धी सरोदेच्या प्रामाणिकपणाचे भुसावळात कौतुक

 

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                सध्याच्या धावपळीच्या आणि कलियुगाच्या जगात प्रामाणिकपणाचे दर्शन घडणे दुर्मिळ झाले आहे. मात्र, भुसावळ शहरातील एका आठवीत शिकणाऱ्या चिमुकलीने स्विमिंग पूलमध्ये सापडलेली तब्बल ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन संबंधितांना परत करून प्रामाणिकपणाचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. रिद्धी नरेंद्र सरोदे (रा. विकास कॉलनी) असे या चिमुकलीचे नाव असून, तिच्या या कृत्याबद्दल संपूर्ण शहरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

पाण्यात चमकली चैन अन्…

 

सध्या उन्हाळ्याची सुटी असल्याने भुसावळ शहरातील जळगाव रोड जवळील ‘वसंत विहार’ येथील ‘जी.डी. स्पोर्ट्स’च्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी नागरिकांची व बच्चेकंपनीची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, नरवीर सिंग रावळ हे या पूलमध्ये स्विमिंग करत असताना, त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये बाजारमूल्य असलेली सोन्याची चैन अचानक पाण्यात निखळून पडली. पोहण्याच्या नादात ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. त्याच वेळी तेथे पोहण्याचा आनंद घेत असलेल्या रिद्धी सरोदे या चिमुकलीची नजर पाण्याच्या तळाशी चमकणाऱ्या त्या सोन्याच्या चैनवर पडली. क्षणाचाही विलंब न लावता रिद्धीने ती चैन पाण्यातून बाहेर काढली.

 

खात्री पटवून मूळ मालकाला सुपूर्द

 

चैन हाती आल्यानंतर रिद्धीने समजूतदारपणा दाखवत प्रथम स्विमिंग पूलच्या बाहेर असलेल्या लोकांकडे विचारपूस केली. मात्र, कोणाकडूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने तिने ती चैन तात्काळ तिथले कोच अक्षय कोळी यांच्या स्वाधीन केली. कोच कोळी यांनीही तत्परता दाखवत ती चैन कार्यालयात जमा केली. दुसरीकडे, नरवीर सिंग रावळ हे घरी गेल्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांच्या गळ्यातील चैन हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने स्विमिंग पूलच्या कार्यालयाशी संपर्क साधून चौकशी केली. कार्यालय प्रशासनाने ‘सीसीटीव्ही फुटेज’ची तपासणी केली. पूर्ण खात्री पटल्यानंतरच ती चैन नरवीर सिंग रावळ यांच्या स्वाधीन करण्यात आली.

 

बक्षीस नाकारले, पण प्रेमाग्रहाखातर स्वीकारले!

 

चिमुकल्या रिद्धीच्या या प्रामाणिकपणाने भारावून जाऊन नरवीर सिंग रावळ यांनी तिला रोख बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. मात्र, “प्रामाणिकपणा हे माझे कर्तव्य होते,” असे सांगत रिद्धीने ते बक्षीस घेण्यास नम्रपणे नकार दिला. अखेर रावळ यांनी अत्यंत प्रेमाग्रहाने आणि जबरदस्तीने तिला ते बक्षीस स्वीकारण्यास भाग पाडले.

 

उन्हाळ्याच्या दिवसांत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल, पैसे आणि मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या किंवा हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, रिद्धीने दाखवलेला हा प्रामाणिकपणा समाजाला नवी दिशा देणारा ठरला आहे. तिच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल स्विमिंग पूलचे संचालक देविदास पाटील, नरेंद्र सरोदे, स्वप्निल पाटील, सुधीर पाटील आदी मान्यवरांनी रिद्धीचा विशेष सन्मान केला. एका सामान्य कुटुंबातील या चिमुकलीने दाखवलेल्या असामान्य प्रामाणिकपणाची चर्चा सध्या भुसावळ शहरात मोठ्या अभिमानाने केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या