लूटप्रकरणातील व्यापारी गोळ्या बिस्कीट की “गुटखा” विक्री करणारा..?
यावल शहरात चर्चेचा विषय.
यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील दुकानदारांना आवश्यक तो माल दुकानात पोच करून वसु ली करणारा तो किरकोळ व्यापारी गोळ्या बिस्कीट विक्री करणारा आहे की अवैध गुटखा विक्री करणारा..? तसेच त्याच्याजवळ नेमका कोणत्या व्यवसायाचा अधिकृत परवाना आहे किंवा नाही आणि त्याची १८ हजार रुपयाची रोकड आरोपींनी बळजबरीने कोणत्या कारणाने हिसकावली याबाबत यावल पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास त्या व्यापाराचा अवैध व्यवसाय आहे की अधिकृत व्यवसाय आहे हे जनतेसमोर येईल.
याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील किरकोळ दुकानदारांना,टपरी वाल्यांना, गुटखा विक्रेत्यांना दिलेल्या मालाची वसुली करून फायदा घेणाऱ्या एका व्यापाऱ्याला भर रस्त्यात अडवून लुटल्याची खळबळजनक घटना यावल शहरात चार-पाच दिवसांपूर्वी घडली आहे.फिर्यादी प्रमोद जगन्नाथ बुरुजवाले हे गोळ्या बिस्किटांच्या मालाचे जमा झालेले पैसे घेऊन बजाज शोरूम कडे जात होते यावेळी मागून मोटरसायकल वरून आलेला आसिफ तडवी रा.बोरावलगेट आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी प्रमोदची कॉलर पकडून अश्लील शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची दमदाटी करीत त्याच्यातील १८ हजार रुपयाची रोकड आरोपींनी बळजबरीने हिसकावून पोबारा केला रात्रीच्या वेळेस घडलेल्या या धाडसी घटनेमुळे यावल शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असले तरी तो व्यापारी गोळ्या बिस्कीट विक्री करणारा नसून अवैध गुटखा विक्री करणारा असल्याची तसेच त्याच्याजवळ १८ हजारापेक्षा जास्त रक्कम असल्याची संपूर्ण व्यापारी वर्तुळात चर्चा आहे.यामुळे अवैध गुटखा विकणाऱ्यांना यावल शहरात कोणाचे अभय आहे.? याबाबत सुद्धा जोरदार चर्चा आहे.