धक्कादायक – पित्याने चार निष्पाप मुलांना विहिरीत फेकले; स्वतः उडी घेऊन केली आत्महत्या !

बुलढाणा खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – कौटुंबिक वादातून एका पित्याने आपल्या चार लहान मुला-मुलींना विहिरीत फेकून दिल्याची आणि नंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात सोमवारी (२५ मे) सकाळी उघडकीस आली. या घटनेत पित्यासह चार निरागस बालकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मयत विजय मुसा किराडिया (वय २७, रा. राजुरा, ग्रामपंचायत उमापूर) असे पित्याचे नाव आहे. विजय आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र भांडण सुरू होते. रविवारी (२४ मे) विजय यांनी पत्नीला माहेरी पाठवले. त्यानंतर मध्यरात्री विजय यांनी आपल्या चार लहान मुलांना — प्रित (७), प्राची (५), पूर्वी (३) आणि अवघ्या दोन वर्षांचा पीयूष — विहिरीत फेकले. नंतर ते स्वतःही विहिरीत उडी घेतली.
सोमवारी सकाळी ग्रामस्थांना विहिरीत मृतदेह तरंगताना दिसल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. ग्रामस्थांच्या सहकार्याने विहिरीतून पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले.पोलिसांनी प्राथमिक तपासात घटना कौटुंबिक कलहातून घडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. मृतदेहांचे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.या घटनेमुळे आदिवासीबहुल भागात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच हळहळ व्यक्त केली जात आहे.

