Thursday, May 28, 2026
Homeजळगावहरविलेले १०९ मोबाईल मालकांच्या हाती ; भुसावळात विशेष कार्यक्रमात मोबाईल सुपूर्द !

हरविलेले १०९ मोबाईल मालकांच्या हाती ; भुसावळात विशेष कार्यक्रमात मोबाईल सुपूर्द !

हरविलेले १०९ मोबाईल मालकांच्या हाती ; भुसावळात विशेष कार्यक्रमात मोबाईल सुपूर्द !

 

जळगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; १५ लाखांहून अधिक किंमतीचे मोबाईल परत !

 

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव जिल्हा पोलीस दलाने हरविलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून नागरिकांचा विश्वास संपादन करणारी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात तब्बल १५ लाख १९ हजार ४९८ रुपये किंमतीचे १०९ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.

 

या कार्यक्रमात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या हस्ते मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.भुसावळ उपविभागातील शहर, बाजारपेठ, तालुका आणि नशिराबाद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ६८ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले. या मोबाईलची किंमत सुमारे ९ लाख ४४ हजार ४९८ रुपये असल्याचे सांगण्यात आले. तर मुक्ताईनगर उपविभागातील मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव आणि सावदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ४१ मोबाईल, अंदाजे ५ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले.

 

पोलीस कर्मचाऱ्यांसह पत्रकारांनाही हेल्मेट वाटप

 

कार्यक्रमात नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले. भुसावळ उपविभागातील ४५ पोलीस अंमलदार तसेच पाच पत्रकारांना विविध दुचाकी शोरूमच्या सहकार्याने हेल्मेटचे वाटप करण्यात आले.यामध्ये योगेश चंदन, दंपेश फेगडे, दिपक पांडे, सुहास बि-हाडे आणि शुभम परदेशी यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

नव्याने सुसज्ज दालनाचे उद्घाटन

 

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या दालनाचे उद्घाटनही पोलीस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, राहुल वाघ, महेश गायकवाड यांच्यासह भुसावळ उपविभागातील अधिकारी, पोलीस अंमलदार, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या