फरार अमीर उर्फ ‘बॉक्सर’ अटकेत; गावठी कट्ट्यासह बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ शहरातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अमीर उर्फ अमीर बॉक्सर बरकत अली (वय २१, रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) याला बाजारपेठ पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी कारवाई करत ताब्यात घेतले.
आरोपीकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून, शहरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे.ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्था. गु. शा. पथकाला आरोपी अमीर बॉक्सर याच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचत रात्री अकरा वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील घोडेपीर बाबा परिसर येथे आरोपीला ताब्यात घेतले.या कारवाईत पोलीस कर्मचारी गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी आणि राहुल वानखेडे यांनी सहभाग घेत आरोपीला शिताफीने पकडले.याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गु.र.न. १५८/२६ अन्वये भारतीय दंड विधानातील विविध कलमे तसेच आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमीर बॉक्सर हा या गुन्ह्यात फरार होता.
कारवाईदरम्यान आरोपीकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून, त्याला पुढील चौकशीसाठी बाजारपेठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोउपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.