Friday, May 29, 2026
Homeजळगावभुसावळात मोबाईल परतावा कार्यक्रम चर्चेत; पत्रकारांच्या दुजाभावाच्या आरोपाने वाद

भुसावळात मोबाईल परतावा कार्यक्रम चर्चेत; पत्रकारांच्या दुजाभावाच्या आरोपाने वाद

१५ लाखांचे १०९ मोबाईल नागरिकांना परत; पत्रकारांच्या दुजाभावाच्या आरोपाने वातावरण तापले

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव जिल्हा पोलीस दलाने हरविलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधून नागरिकांचा विश्वास संपादन करणारी उल्लेखनीय कामगिरी करत भुसावळ येथे विशेष मोबाईल परतावा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात तब्बल १५ लाख १९ हजार ४९८ रुपये किंमतीचे १०९ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या हस्ते नागरिकांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले. हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.भुसावळ उपविभागातील शहर, बाजारपेठ, तालुका आणि नशिराबाद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ६८ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले. या मोबाईलची किंमत सुमारे ९ लाख ४४ हजार ४९८ रुपये असल्याचे सांगण्यात आले. तर मुक्ताईनगर उपविभागातील मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव आणि सावदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ४१ मोबाईल, अंदाजे ५ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले.कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ४५ पोलीस अंमलदार तसेच पाच पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. विविध दुचाकी शोरूमच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील नव्याने सुसज्ज दालनाचे उद्घाटनही करण्यात आले.

मोबाईल परतावा कार्यक्रमात निवडक पत्रकारांनाच स्थान? शहरात चर्चा रंगली

मात्र कार्यक्रमानंतर पत्रकारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने काही मोजक्या पत्रकारांनाच कार्यक्रमात स्थान दिल्याचा आरोप पत्रकार बांधवांकडून करण्यात आला. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सोशल मीडियामधील अनेक पत्रकार कार्यरत असताना सर्व माध्यम प्रतिनिधींना समान वागणूक न दिल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
“लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान केवळ भाषणांत नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीत दिसला पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही पत्रकारांनी व्यक्त केली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या भुसावळातील पहिल्याच कार्यक्रमात पत्रकारांकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या