Friday, May 29, 2026
Homeक्राईमभुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एसीबीची धडक कारवाई ; पोलीस उपनिरीक्षकासह खाजगी पंटराविरोधात...

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एसीबीची धडक कारवाई ; पोलीस उपनिरीक्षकासह खाजगी पंटराविरोधात गुन्हा दाखल!

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एसीबीची धडक कारवाई ; पोलीस उपनिरीक्षकासह खाजगी पंटराविरोधात गुन्हा दाखल!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकासह खाजगी पंटराविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून संबंधित पंटराला एसीबीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरोधात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तसेच ‘चॅप्टर केस’ची कारवाई न करण्यासाठी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. नंतर ही रक्कम २० हजार रुपयांवर ठरल्यानंतर तक्रारदाराने थेट जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली.तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार रक्कम देण्यासाठी पुढे सरसावला असता संबंधित पोलीस उपनिरीक्षक व पंटराला संशय आल्याने त्यांनी रक्कम स्वीकारण्यास नकार दिला.
मात्र एसीबीच्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कारवाईला वेग आला.या प्रकरणात बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे तसेच खाजगी पंटर सलीम कुरेशी (रा. बोदवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, राजू सांगळे हे वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती समोर आली असून सलीम कुरेशी याला एसीबीने ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हेमंत नागरे, निरीक्षक स्मिता नवघरे आणि त्यांच्या पथकाने केली.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या