पोलिसांना तक्रार, पुरावेही दिले; तरी कारवाई शून्य असल्याचा आरोप
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – वरणगाव येथील आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी) वसाहतीत घरगुती एलपीजी गॅसचे वाहनांमध्ये कथितपणे अवैधरित्या रिफिलिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणात संबंधित यंत्रणांकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते संजय त्रिलोकनाथ खन्ना यांनी केला आहे. या आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहितीनुसार असे की, २३ एप्रिल २०२६ रोजी संजय खन्ना यांनी वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत आयुध निर्माणी वसाहतीतील क्वॉर्टर क्रमांक ६२-ए, टाईप-३ येथे घरगुती एलपीजी गॅसचे वाहनांमध्ये अवैध रिफिलिंग सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना घडू शकते, असा इशारा तक्रारीत देण्यात आला होता.
व्हिडिओ पुरावे दिल्याचा तक्रारदारांचा दावा !
तक्रारदारांनी संबंधित प्रकाराचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करत जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, तक्रारीनंतरही कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार सादर केली.तक्रारीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून आवश्यक कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी कोणत्या टप्प्यावर आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.एच. के. डुबले यांनीही आयुध निर्माणी प्रशासनाकडे यासंदर्भात अनेक लेखी तक्रारी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या अर्जानुसार, संबंधित ठिकाणी अवैध गॅस रिफिलिंग, अनधिकृत बांधकाम, अनधिकृत शेड तसेच इतर कथित बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.तक्रारीत मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडर आणि रिफिलिंगसाठी वापरली जाणारी उपकरणे असल्याचा दावा करण्यात आला असून त्यामुळे वसाहतीतील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच वीज चोरीसारख्या गंभीर बाबींचाही उल्लेख करण्यात आला आहे.
“कारवाईऐवजी संरक्षण?” – एपीआयवर तक्रारदारांचे गंभीर आरोप
संजय खन्ना यांनी काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित अधिकारी किंवा संबंधित पक्षांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही, नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाकडून योग्य वेळी कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.