कुलूप तोडून मंदिरात प्रवेश; दानपेटी फोडून रोकड घेऊन चोर फरार

सीसीटीव्हीत स्पष्ट चेहरा, तरीही चोरटा मोकाट; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील ममुराबाद रस्त्यावरील म्हाळसा देवी मंदिरात अज्ञात चोरट्याने मध्यरात्री धाडसी चोरी करत दानपेटी फोडून सुमारे २० ते २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली असून संपूर्ण प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून संशयिताचा शोध सुरू केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, ममुराबाद रस्त्यालगत असलेल्या शेत परिसरातील म्हाळसा देवी मंदिराची देखभाल जोशी कुटुंबीयांकडून केली जाते. शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सुरुवातीला त्याने गाभाऱ्यातील लोखंडी पेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये काहीही हाती न लागल्याने त्याने मंदिरातील दानपेटीकडे मोर्चा वळविला.चोरट्याने सोबत आणलेल्या लोखंडी पट्टीच्या सहाय्याने दानपेटीचे कुलूप तोडले आणि त्यामधील रोकड पिशवीत भरून घटनास्थळावरून पलायन केले. दानपेटीत अंदाजे २० ते २५ हजार रुपयांची चिल्लर व रोख रक्कम असल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, मंदिरात प्रवेश केल्यापासून ते दानपेटी फोडून रोकड घेऊन पळ काढेपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे रेकॉर्ड झाला आहे. फुटेजमध्ये संशयिताचा चेहरा स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा मिळाला असून तो परप्रांतीय असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस कर्मचारी प्रकाश चिंचोरे व सोपान पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी डॉग स्कॉड व ठसेतज्ज्ञांच्या पथकानेही पाहणी करून काही महत्त्वाचे पुरावे संकलित केले.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू आहे.
दरम्यान, याच मंदिरात दोन वर्षांपूर्वीही दानपेटी फोडून चोरीची घटना घडली होती. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, सुरक्षा व्यवस्था असतानाही पुन्हा चोरी झाल्याने मंदिरांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

