Friday, June 5, 2026
Homeगुन्हाराष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात : पती-पत्नी, चिमुकलीसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात : पती-पत्नी, चिमुकलीसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात : पती-पत्नी, चिमुकलीसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर गुरुवारी (दि. 5 जून) दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत महिला, एक अल्पवयीन मुलगा आणि एका वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला.
प्राप्त माहितीनुसार, वरणगावजवळील हिरा मारुती परिसरातून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या चौघांना एमएच-19 ईव्ही-5353 क्रमांकाच्या भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर दुचाकीवरील सर्वजण गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये विजय शंकर काळे वय 20, ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय 30 वर्षे), विघ्नेश शंकर चव्हाण (वय 14 वर्षे) आणि मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय 1 वर्ष) सर्व रा . मलकापूर यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या सर्वाना जळगाव येथील शासकिय वैदयकीय महाविद्यालयात पोहचविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे .

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांना आणि महामार्ग सुरक्षा पथकाला तातडीने माहिती देण्यात आली. वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना मदत करण्यासोबतच वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. काही काळ राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती.
दरम्यान, अपघातानंतर स्कॉर्पिओ वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मृतदेहांचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहनाचा वेग आणि चालकाचा निष्काळजीपणा यामुळे दुर्घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. वरणगांव पोलीस ठाण्यात उशिरा पर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते .
या हृदयद्रावक घटनेमुळे वरणगाव व परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले असून महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या