फुलगावच्या सरपंचपदी शाम फुलगावकर कायम; ग्रामसभेत ग्रामस्थांनी दिला कौल!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ तालुक्यातील फुलगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शाम फुलगावकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाला अखेर ग्रामस्थांनी नाकारत त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे शाम फुलगावकर हे सरपंचपदी कायम राहणार आहेत.
फुलगाव ग्रामपंचायतीतील काही सदस्यांनी सरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रक्रियेनंतर प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता व त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ५ जून रोजी फुलगाव येथे विशेष ग्रामसभा आयोजित केली.या ग्रामसभेत सरपंचांवरील विश्वासाबाबत मतदान घेण्यात आले. याप्रसंगी जिल्हा धिकारी कार्यालयातील प्रतिनिधी व महसुल विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते . प्रक्रियेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. झालेल्या मतदानात शाम फुलगावकर यांना विरोधकापेक्षा ४८ मते अधिक मिळाल्याने त्यांना ग्रामस्थांचा स्पष्ट पाठिंबा मिळाला आणि ते सरपंचपदी कायम राहिले. या प्रक्रीयेत दिड हजारांहून अधिक ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला .
दरम्यान, फुलगाव ग्रामपंचायतीत भाजपचे आठ सदस्य असून त्यांच्याकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तर शाम फुलगावकर हे सध्या शिवसेनेशी संबंधित आहेत. ग्रामस्थांनी सरपंचांच्या बाजूने कौल दिल्याने गावातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून या निकालाची तालुकाभर चर्चा होत आहे.ग्रामस्थांनी दिलेल्या या निर्णयामुळे फुलगावमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांनी मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला आहे.