अटगाव स्थानकावरील विशेष ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम

अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले; प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा
भुसावळ : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत अटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी तसेच जुने पॅनेल हटविण्याच्या कामासाठी ६ जून ते ७ जून दरम्यान विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. आसनगाव आणि थानसिट स्थानकांदरम्यान हा ब्लॉक ६ जून रोजी दुपारी २ वाजेपासून ७ जून रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत राहणार असल्याने अनेक मेल, एक्सप्रेस आणि विशेष गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.
या कालावधीत काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून त्यामध्ये सीएसएमटी-धुळे एक्सप्रेस, धुळे-सीएसएमटी एक्सप्रेस तसेच पंचवटी एक्सप्रेसच्या दोन्ही फेऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय काही गाड्या मनमाड आणि नाशिक रोड स्थानकांपर्यंतच धावणार असून त्यांचे शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येणार आहे. काही गाड्यांच्या प्रारंभिक स्थानकांमध्येही बदल करण्यात आले आहेत.
हावडा मेल, अमृतसर एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस, शालीमार एक्सप्रेस, बनारस सुपरफास्ट आणि पाटलीपुत्र एक्सप्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने सोडण्यात येणार आहेत. तसेच कामायनी एक्सप्रेस, गोरखपूर विशेष, पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस, बल्लारशाह एक्सप्रेस, साईनगर शिर्डी एक्सप्रेस आणि देवगिरी एक्सप्रेस या गाड्यांचे मार्ग तात्पुरते बदलण्यात आले असून त्या पर्यायी मार्गाने चालविण्यात येतील.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. नाशिक रोड आणि मनमाड येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्यांतील प्रवाशांना मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रवास रद्द करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष आरक्षण खिडक्यांमार्फत तिकीट परताव्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

