जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदीपात्रातील वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध वाळू उत्खनन प्रकरणी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत सावखेडा मंडळाच्या मंडळाधिकारी कल्याणी पाटील आणि तलाठी पवनकुमार शिंगारे यांना निलंबित करण्यात आले आहे.
तापी नदीपात्रातील वाळू घाटावर नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करत लाखो रुपयांचा वाळूसाठा जप्त केला होता. या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, जप्त यंत्रसामग्रीसह दंडाची एकूण रक्कम दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अमळनेर आणि चोपडा येथील संबंधित महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत प्राथमिक स्तरावर कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्याचे निष्पन्न झाल्याने मंडळाधिकारी आणि तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकरणात अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा आणि चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावरील संभाव्य कारवाईकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. वरिष्ठ प्रशासन आणि शासन या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून महसूल विभागातही या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
अवैध वाळू उत्खननाविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून, भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर उपक्रमांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा प्रशासनाचा निर्धार असल्याचे संकेत मिळत आहेत.