Wednesday, June 10, 2026
Homeजळगावशिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. जगदीश दादा कापडे यांचे निधन; शिवसैनिकांमध्ये शोककळा

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. जगदीश दादा कापडे यांचे निधन; शिवसैनिकांमध्ये शोककळा

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. जगदीश दादा कापडे यांचे निधन; शिवसैनिकांमध्ये शोककळा

 

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाप्रमुख ॲड. जगदीश दादा कापडे यांच्या निधनाने भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने शिवसेनेच्या एका निष्ठावान, अभ्यासू आणि लढवय्या नेतृत्वाचा अंत झाल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या कठीण काळातही त्यांनी निष्ठेने पक्षाचे काम केले होते .

शिवसेना ग्रामीण भागात रुजविण्यासाठी आणि संघटना वाढविण्यासाठी ॲड. कापडे यांनी मोठे योगदान दिले. पक्षाची ताकद मर्यादित असताना त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांना एकत्र आणून शिवसेनेचा विचार जनमानसात पोहोचविण्याचे कार्य केले. विशेषतः तरुण शिवसैनिकांवर विविध कारणांनी पोलीस कारवाई अथवा गुन्हे दाखल झाल्यास त्यांना कायदेशीर मदत करून आधार देण्याचे काम त्यांनी निस्वार्थपणे केले.

त्या काळात विद्यमान पालकमंत्री Gulabrao Patil, स्व. राजेंद्रजी दायमा, संजय कोलते, गोविंदराव मांडवगणे, विलास सेठ मुळे, शाम गोंदेकर यांच्यासह अनेक जुन्या शिवसैनिकांनी संघटना आक्रमकपणे वाढविण्यात योगदान दिले. या नेतृत्वामध्ये ॲड. जगदीश दादा कापडे यांचे स्थान विशेष मानले जात होते.

न्यायालयात एक नामांकीत वकील म्हणून त्यांची ख्याती होती .

त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करताना अनेक शिवसैनिकांनी “जगदीश दादा यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा होणे कठीण आहे,” अशा भावना व्यक्त केल्या. त्यांच्या कार्याची आणि शिवसेनेप्रती असलेल्या निष्ठेची आठवण कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देत राहील, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

ॲड. जगदीश दादा कापडे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व कापडे परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशी प्रार्थना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि कायदे क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या