Wednesday, June 10, 2026
Homeजळगावपाण्यासाठी त्रस्त, मुख्याधिकाऱ्यांना मात्र जनभावनांची पर्वा नाही?

पाण्यासाठी त्रस्त, मुख्याधिकाऱ्यांना मात्र जनभावनांची पर्वा नाही?

पाण्यासाठी त्रस्त, मुख्याधिकाऱ्यांना मात्र जनभावनांची पर्वा नाही?

“व्हिडिओचा मला फरक पडत नाही” या वक्तव्याने मुख्याधिकारी अविनाश गांगोडे वादाच्या भोवऱ्यात…

 

फैजपूर | खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

 

फैजपूर शहरात भीषण पाणीटंचाईने नागरिकांचे जगणे कठीण झाले असताना, प्रशासनाकडून संवेदनशीलतेची अपेक्षा असलेल्या जनतेला उर्मट वागणूक मिळत असल्याचा आरोप होत आहे. मंगळवारी शिव कॉलनी परिसरात पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादात मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी कथितपणे “शहाणपणा करू नका, व्हिडिओचा मला फरक पडत नाही” असे वक्तव्य केल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे. दोन दिवसाआड मिळणारे पाणी आता पाच ते सहा दिवसांनी मिळत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. महिलांना पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे, तर अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून ठोस कृती अपेक्षित असताना, नागरिकांशी संघर्षाची भाषा वापरली जात असल्याचा आरोप होत आहे.

 

शिव कॉलनी येथे नवीन पाईपलाईनच्या कामात आवश्यक तांत्रिक दक्षता न घेतल्यामुळे पाईपलाईन पुन्हा फुटल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या निष्काळजीपणाबाबत जाब विचारण्यासाठी नागरिक एकत्र आले असता, प्रश्न सोडविण्याऐवजी वाद वाढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 

लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा आणि प्रशासनाच्या कामकाजाचे चित्रीकरण करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जनतेच्या संतापाकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी “व्हिडिओचा मला फरक पडत नाही” अशी भूमिका घेणे, हे प्रशासनातील जबाबदारीच्या भावनेला साजेसे आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, शहरात पाणीपुरवठा विभागातील तांत्रिक नियोजन, कामांची गुणवत्ता आणि देखरेख यावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. वारंवार पाईपलाईन फुटणे, रखडलेली कामे आणि अनियमित पाणीपुरवठा याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा सवाल फैजपूरकर विचारत आहेत.

 

नागरिकांना पाणी हवे आहे, संघर्ष नाही; उपाययोजना हव्यात, उर्मट उत्तरे नाहीत. फैजपूरकरांच्या संयमाचा अंत होत असून, पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाने उत्तरदायित्व स्वीकारून तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांशी संवाद साधताना संयम व संवेदनशीलता दाखवावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या