उकाड्याचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला; गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाच्या घरातून ७३ हजारांचा ऐवज लंपास !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे कुटुंबीय गच्चीवर झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. ५ जून रोजी उघडकीस आली. या प्रकरणी दि. १५ जून रोजी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील करंज येथील सागर बाळू धनगर (वय २६) हे कुटुंबीयांसह उकाड्यामुळे घराच्या गच्चीवर झोपले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील ३७ हजार रुपयांची रोकड, सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडल, १२ हजार रुपयांचे झुमके, १२ हजार रुपयांचे मणी तसेच सहा हजार रुपये किमतीची चांदीची चेन असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
दि. ५ जून रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सागर धनगर यांनी दि. १५ जून रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण करीत आहेत.
दरम्यान, चोरीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये तीन चोरटे दुचाकीवर आल्याचे दिसून येत असले, तरी त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने अद्याप त्यांची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू
आहे.

