आम्ही पाठीवर नाही, छातीवर वार करणारे”; गोकुळ गीतेंच्या विजयानंतर रेश्मा काळे यांची तीव्र प्रतिक्रिया

जळगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या अनपेक्षित विजयानंतर महायुतीतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत गीतेंनी विजय मिळवल्यानंतर जळगावमधील शिवसेना (शिंदे गट) नेत्या तथा माजी बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.
“गोकुळ गीते यांनी पाठीवर वार केला. आम्हाला पाठीवर वार करायला शिकवलेले नाही, आम्ही छातीवर वार करणारे आहोत,” असे म्हणत त्यांनी गीतेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
“आम्ही महायुतीचा धर्म पाळला, नाशिकमध्ये मात्र वेगळे चित्र”
माध्यमांशी संवाद साधताना रेश्मा काळे म्हणाल्या, आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून महायुतीचा धर्म पाळला आणि वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाचा मान राखत उमेदवारी मागे घेतली. मात्र, नाशिकमध्ये तशी भूमिका घेतली गेली नाही, याचे दुःख वाटते. जळगावमध्ये आम्ही बंडखोरी कायम ठेवली असती, तर आमच्याही विजयाची शक्यता होती.”
जळगाव आणि नाशिकमधील राजकीय घडामोडींची चर्चा
अर्ज माघारीच्या काळात जळगाव आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांत महत्त्वाच्या राजकीय हालचाली घडल्या होत्या. जळगाव विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी महायुतीच्या हितासाठी आपला अर्ज मागे घेतला होता.
दुसरीकडे, नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली नसल्याने तेथील राजकीय समीकरणे कायम चर्चेत राहिली. अखेर त्यांनी ३८९ मते मिळवत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला.
महायुतीतील अंतर्गत नाराजी चर्चेत
नाशिकमधील निकालानंतर महायुतीतील काही नेत्यांकडून नाराजी व्यक्त होत असून, रेश्मा काळे यांच्या प्रतिक्रियेमुळे नाशिक आणि जळगावमधील राजकीय घडामोडींविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात या घडामोडींमुळे महायुतीतील स्थानिक पातळीवरील समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

