Thursday, June 25, 2026
Homeजळगावसाकेगावातून सांडपाणी वाहिनीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद ठेवण्याची...

साकेगावातून सांडपाणी वाहिनीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद ठेवण्याची भूमिका

साकेगावातून सांडपाणी वाहिनीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद ठेवण्याची भूमिका

 

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

जळगाव शहरातील सांडपाणी दिपनगर येथे नेण्यासाठी विश्वराज एन्व्हायरमेंट लिमिटेड कंपनीमार्फत साकेगाव गावाच्या हद्दीतून टाकण्यात येत असलेल्या सांडपाणी वाहिनीविरोधात ग्रामस्थांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. गावातील नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता व पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करत ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर करण्यात आले असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत पाइपलाईनचे काम तातडीने बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अंदाजे १ ते १.५ मीटर व्यासाची ही मोठी सांडपाणी वाहिनी गावातील मुख्य वस्ती, शेकडो घरांसमोरून तसेच नदी परिसरातून नेली जात आहे. या प्रकल्पामुळे सुमारे १५० ते २०० कुटुंबांवर थेट परिणाम होणार असून भविष्यात पाइपलाईनला गळती, तडे किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास गावकऱ्यांच्या आरोग्यावर, शेतीवर, जनावरांवर आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ग्रामविकास अधिकारी यांनी या कामाला मासिक बैठकीत परवानगी देण्यात आल्याचे सांगितले असले तरी, एवढ्या महत्त्वाच्या आणि गावाच्या भवितव्याशी निगडित विषयावर ग्रामसभा घेऊन सर्वसामान्य नागरिकांची संमती घेणे आवश्यक होते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “गावाच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न असताना निर्णय बंद दाराआड घेण्यात आला का?” असा संतप्त सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे स्वतंत्र तांत्रिक व पर्यावरणीय तपासणी, खुली जनसुनावणी, पाइपलाईनच्या सुरक्षिततेबाबत लेखी हमी, पर्यावरणीय परिणामांचा सविस्तर अहवाल आणि गावाबाहेरील पर्यायी मार्गाचा विचार करण्याची मागणी केली आहे.

 

यापूर्वी विविध शासकीय योजनांतील कामांमध्ये त्रुटी राहिल्याचा अनुभव असल्याने केवळ तोंडी आश्वासनांवर विश्वास ठेवता येणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाची पारदर्शक माहिती ग्रामस्थांसमोर मांडल्याशिवाय आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय काम सुरू ठेवू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनावर गणेश पाटील ,प्रतीक भोळे , दिनेश शिंदे, दगडू पाटील , पवन भागवत , मनोज नेहते , सुनील पाटील ,चंद्रकांत कोलते , अशोक कोळी , दिगंबर फालक , किरण पाटील , सुनील चौधरी , सागर परदेशी, बबलू धनगर , साहिल पटेल, गोविंदा वाणी , चेतना कोलते , गणेश कोळी ,राज परदेशी , शुभम भोई ,विजय बाऊस्कर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .

या निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी भुसावळ, जिल्हाधिकारी जळगाव, गटविकास अधिकारी भुसावळ यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या असून, साकेगावातील वाढता विरोध लक्षात घेता प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या