हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; जलसाठ्यात वाढीची शक्यता

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी जळगाव : जिल्ह्यासाठी जीवनदायी मानल्या जाणाऱ्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (दि. २५) समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. तापी नदीच्या उगम परिसरासह मध्य प्रदेशातील विविध भागांत झालेल्या पावसामुळे आगामी काही दिवसांत धरणातील पाण्याच्या आवकेत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील २४ तासांत हतनूर धरण परिसरात १९ मिमी पाऊस झाला असून यंदाच्या हंगामातील एकूण पावसाची नोंद २४ मिमीपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सिंचन व्यवस्था तसेच औद्योगिक गरजा मोठ्या प्रमाणावर हतनूर धरणावर अवलंबून असल्याने पाणलोट क्षेत्रातील पावसाकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागून असते.
धरणाच्या मुख्य पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापन केंद्रांवरही चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. बऱ्हाणपूर येथे ८५.४ मिमी, देढतलाई येथे ६३.८ मिमी, लखपुरी येथे ४१.४ मिमी, अकोला येथे १.४ मिमी तर गोपालखेडा येथे ०.६ मिमी पाऊस झाला. या सर्व केंद्रांवर मिळून १९२.६ मिमी पावसाची नोंद झाल्याने तापी खोऱ्यातील प्रवाह वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या हतनूर धरणाची जलपातळी २१०.६१० मीटर इतकी असून धरणाची पूर्ण जलसाठा पातळी २१४ मीटर आहे. धरणात एकूण २१८.४० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५६.२९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी उपयुक्त पाणीसाठा ८५.४० दशलक्ष घनमीटर असून तो ३३.४९ टक्के आहे.
धरणाचे कोणतेही रेडियल गेट सध्या उघडण्यात आलेले नसून गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू नाही. मात्र कालव्यामधून २.८३ क्युमेक्स (१०० क्युसेक) आणि आर.एस. गेटमधून २२.६५ क्युमेक्स (८०० क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे येत्या काही दिवसांत धरणातील जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता असून जिल्ह्यातील पाणीपुरवठा आणि सिंचन व्यवस्थेसाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे.

