रावेर-मुक्ताईनगरात मुसळधार पावसाचा कहर; पुराच्या पाण्यात प्रवासी बस अडकली, मोठी दुर्घटना टळली

मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात मान्सूनने अखेर दमदार हजेरी लावत रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांना अक्षरशः झोडपून काढले. बुधवारी काही तास झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. नाले, ओढे आणि लहान नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की गावाजवळ साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आलेली प्रवाशांनी भरलेली खासगी बस पुराच्या पाण्यात अडकून पडली. नाल्यावरून वेगाने पाणी वाहत असताना बसचालकाने वेळेवर वाहन थांबवत प्रसंगावधान दाखवले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
रावेर तालुक्यातही पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक गावांमध्ये नाल्यांचे पाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरल्याने संसारोपयोगी वस्तू, धान्य तसेच व्यापाऱ्यांचा माल खराब झाला. अचानक आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली. काही ठिकाणी संपर्क मार्ग तात्पुरते बंद पडले होते. नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.दरम्यान, या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गात मात्र समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक ओलावा निर्माण झाल्याने पेरणीच्या कामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र काही भागांत अतिवृष्टीमुळे शेतजमिनींचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

