Saturday, July 4, 2026
Homeजळगावतुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा; पावसाळ्यात विद्युत दुर्घटना टाळा

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा; पावसाळ्यात विद्युत दुर्घटना टाळा

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा; पावसाळ्यात विद्युत दुर्घटना टाळा

Oplus_131072

<img class

वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे विद्युत अपघातांचा धोका वाढला; महावितरणचे नागरिकांना आवाहन !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – पावसाळ्याला सुरुवात होताच वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे विद्युत दुर्घटनांचा धोका वाढतो, त्यामुळे नागरिकांनी तुटलेल्या विजेच्या तारा, विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर तसेच शॉर्टसर्किटच्या ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखून विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी केले आहे.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी आणि वादळामुळे विजेच्या तारा तुटणे, खांब कोसळणे, ट्रान्सफॉर्मरमध्ये ठिणग्या पडणे किंवा शॉर्टसर्किट होणे अशा घटना घडू शकतात. अशा परिस्थितीत लोंबकळणाऱ्या किंवा तुटलेल्या विजेच्या तारांना स्पर्श करू नये, तसेच ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर किंवा विजेच्या खांबाजवळ शॉर्टसर्किट झाल्यास त्या परिसरात जाणे टाळावे आणि तातडीने महावितरणला माहिती द्यावी.पावसाळ्यात घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेती पंपावरील स्विचबोर्ड, उघड्या विद्युत तारा आणि ओलसर भिंतीलगतची वीजयंत्रणा यांमुळेही अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी घर, सोसायटी, शेत परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांतील विद्युत यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे. विशेषतः पत्र्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अतिरिक्त दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महावितरणने नागरिकांना आणखी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत, दुचाकी टेकवून ठेवू नयेत, तसेच पूरस्थितीत नदीकाठच्या किंवा पाणथळ भागात विशेष दक्षता घ्यावी. भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी शिरणे, झाडे कोसळणे किंवा वीज पडणे यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.अतिवृष्टी, वादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे वीजवाहिन्या तुटणे, खांब कोसळणे अथवा कोणतीही धोकादायक विद्युत घटना आढळल्यास नागरिकांनी तातडीने महावितरणच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन संपर्क क्रमांक

मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्र हेल्पलाईन : 1912
टोल फ्री क्रमांक: 1800-212-3435 / 1800-233-3435
जळगाव मंडल नियंत्रण कक्ष : 7798120155
धुळे मंडल नियंत्रण कक्ष : 7875766763
नंदुरबार मंडल नियंत्रण कक्ष : 7875554543

महावितरणने नागरिकांना पावसाळ्यात सतर्क राहून कोणतीही विद्युत यंत्रणा, तुटलेली तार किंवा शॉर्टसर्किटची घटना आढळल्यास स्वतः हाताळण्याचा प्रयत्न न करता तात्काळ अधिकृत यंत्रणेला माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या