अमृतची हरित ऊर्जा क्षेत्राकडे वाटचाल; ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायासाठी विशेष उपक्रम

<img class

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राज्यभर ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग स्टेशन व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे. वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराच्या पार्श्वभूमीवर राज्यात चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत युवक, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट, एमएसएमई घटक, शेतकरी उत्पादक गट तसेच ग्रामीण भागातील इच्छुक उद्योजकांना ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय सल्ला आणि आर्थिक सहाय्यक उपलब्ध करून दिले जाणार आहे.लाभार्थ्यांना ईव्ही क्षेत्राविषयी मूलभूत ते प्रगत प्रशिक्षण, व्यवसाय नियोजन, प्रकल्प अहवाल तयार करणे, चार्जिंग स्टेशन स्थापनेसाठी आवश्यक मार्गदर्शन, बाजारपेठेचा अभ्यास तसेच व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे नवोदित उद्योजकांना या क्षेत्रात सक्षमपणे व्यवसाय उभारण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
याशिवाय चार्जिंग स्टेशन उभारणी, संचालन व व्यवस्थापन, चार्जिंग उपकरणांची देखभाल, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा, ग्रीन एनर्जी सेवा, ईव्ही संबंधित तांत्रिक सेवा, फ्रँचायझी मॉडेल व्यवसाय तसेच ग्रामीण भागात चार्जिंग हब उभारणी अशा विविध क्षेत्रांमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा** लाभही पात्र उमेदवारांना मिळणार असल्याने इच्छुक उद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक आधार मिळणार आहे. त्यामुळे हरित ऊर्जा क्षेत्रात नव्या पिढीच्या उद्योजकांसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
इच्छुक उमेदवारांनी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘योजना’ विभागातील ‘विशेष योजना’ अंतर्गत ‘EV Charging Station Partner’ या पर्यायाद्वारे ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

