Thursday, July 9, 2026
Homeजळगावशहर मोकाट गुरांच्या विळख्यात! प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? महादेव...

शहर मोकाट गुरांच्या विळख्यात! प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? महादेव मंदिर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शहर मोकाट गुरांच्या विळख्यात!
प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? महादेव मंदिर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मुक्ताईनगर | खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहरात मोकाट गुरांचा वाढता उपद्रव आता गंभीर स्वरूप धारण करत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात दिवसभर मोकाट गुरांचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः सकाळी शहरातील विविध भागांत तर सायंकाळच्या वेळी अलंकार परिसरापासून महादेव मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर मोकाट गुरे रस्ता अडवून उभी राहत असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे.
महादेव मंदिरात दररोज महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह अनेक भाविक दर्शनासाठी येतात. अनेक ज्येष्ठ नागरिक मंदिर परिसरात विरंगुळ्यासाठी बसत असतात. मात्र मोकाट गुरांच्या वावरामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकदा गुरे एकमेकांशी झुंज देताना, धावताना किंवा अचानक रस्त्यावर धाव घेताना दिसून येतात. त्यामुळे एखाद्या निष्पाप चिमुकल्याचा, महिला अथवा ज्येष्ठ नागरिकाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील नागरिकांनी अनेकदा या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. “एखादा मोठा अपघात किंवा जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Oplus_131072

<img class

 

Oplus_131072

विशेष म्हणजे ग्रामपंचायत काळात मोकाट गुरांसाठी कोंढवाड्याची व्यवस्था होती. त्यामुळे रस्त्यांवरील मोकाट गुरांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत होते. मात्र नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर ही व्यवस्था कालांतराने बंद पडल्याचे नागरिक सांगतात. परिणामी शहरात मोकाट गुरांची संख्या वाढत गेली असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
मोकाट गुरांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असून दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक आणि पादचारी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ विशेष मोहीम राबवून मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, कोंढवाड्याची व्यवस्था पुन्हा सुरू करावी आणि शहरातील प्रमुख रस्ते मोकळे करावेत, अशी जोरदार मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
वेळीच उपाययोजना झाली तर मोठा अनर्थ टळू शकतो; अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची नैतिक जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न आता मुक्ताईनगरकर विचारू लागले आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या