जन्मलेल्या नवजात बाळाला नाल्यात फेकणाऱ्या महिलेला ३ वर्षांची शिक्षा !

अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय; डीएनए अहवाल, डॉक्टर, आशा सेविका व पोलीस पाटील यांच्या साक्षी निर्णायक
अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – प्रसूतीनंतर जन्मलेल्या नवजात बाळाला नाल्यात फेकून दिल्याप्रकरणी चोपडा तालुक्यातील एका महिलेला अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी हा निकाल दिला.
ही घटना ६ ऑगस्ट २०२२ रोजी चोपडा तालुक्यातील एका गावात घडली होती. गावात उत्तरकार्याचा कार्यक्रम सुरू असताना नाल्याकडून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने ग्रामस्थांनी तत्काळ पोलीस पाटलांना माहिती दिली. पोलीस पाटलांनी बाळाला सुरक्षित बाहेर काढून कापडात गुंडाळत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी गावातील प्रसूत महिलांची माहिती, आरोग्य विभागाच्या नोंदी तसेच आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने चौकशी केली. त्यात एका महिलेने प्रसूतीची नोंद न करता बाळाला जन्म दिल्याचे उघड झाले. चौकशीत संबंधित महिलेने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान पोलीस पाटील, आशा सेविका, डॉक्टर यांच्या साक्षी तसेच डीएनए अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला. सरकारी पक्षातर्फे अॅड. किशोर बागुल मंगरुळकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. उपलब्ध पुरावे व साक्षींच्या आधारे न्यायालयाने संबंधित महिलेला दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

