गिरणा नदीतील कथित अवैध वाळू उपशाचा धुमाकूळ !

मध्यरात्री ते पहाटेपर्यंत ५० ते ६० डंपरांची भरधाव वाहतूक; महसूल-पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थांचा सवाल !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – गिरणा नदीपात्रातील कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीमुळे शिरसोली परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, रात्रीच्या वेळी होणाऱ्या अवजड डंपर वाहतुकीने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत वाळूने भरलेले ५० ते ६० डंपर गावातून भरधाव वेगाने जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कुन्हाडदा रोड, दापोरा रोड, आकाशवाणीच्या मागील बाजूचा रस्ता तसेच पाचदेवी मंदिर रोड हे मार्ग कथित वाळू वाहतुकीचे प्रमुख मार्ग बनले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्री-बेरात्री सुरू असलेल्या या वाहतुकीमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.गुरुवारी मध्यरात्री दापोरा रस्त्यावर संतप्त ग्रामस्थांनी बैलगाडी रस्त्यावर उभी करून डंपर वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, डंपरचालकांनी तत्काळ मार्ग बदलून कुन्हाडदा रोडवरून वाहतूक सुरू ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाचेही नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.स्थानिकांच्या माहितीनुसार, वाळूने भरलेल्या डंपरांच्या पुढे-मागे दुचाकी व चारचाकी वाहनांमधून काही तरुण फिरत असतात. विरोध करणाऱ्या नागरिकांवर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ग्रामस्थ उघडपणे विरोध करण्यास घाबरत असल्याचे सांगितले जात आहे.
‘इतकी मोठी वाहतूक प्रशासनाच्या नजरेआड कशी?’
ग्रामस्थांनी महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या कथित अवैध वाहतुकीबाबत संबंधित यंत्रणा नेमकी कुठे आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी दापोरा येथे वाळू वाहतुकीवरून ग्रामस्थ आणि कथित वाळू माफियांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली होती. यावेळी धमकी दिल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
गिरणा नदीतून उचलण्यात येणारी वाळू नेरी, जामनेर, पाचोरा यांसह विविध भागांत वाहतूक केली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.अवैध वाळू उपसा व वाहतुकीमागील संपूर्ण साखळीचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

